। रोहा । वार्ताहर ।
तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या शासकीय आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने शासनाकडून तातडीने डॉक्टर उपलब्ध व्हावे, अशी मागणी केली आहे. तसेच, मुंबई-गोवा महामार्गावर सद्या उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. भविष्यात पुराचा धोका टाळण्यासाठी हा पूल बंदिस्त न बांधता आरसीसी खांबावर बांधण्यात यावे, अशा पद्धतीचे महत्वाचे ठराव पारीत करण्यात आले. तसेच, या पुला जवळील सर्व्हिस रोडचे काम पक्के न झाल्यास संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. एकंदरीत भर थंडीत पार पडलेल्या ग्रामसभेत गरम गरम चर्चा करून संबधित प्रशासनाला ग्रामस्थांकडून इशारा देण्यात आला आहे.