द्रोणागिरी दुर्ग संवर्धन, वृक्ष संरक्षण मोहीम उत्साहात

। उरण । वार्ताहर ।
प्राचीन वृक्षांचे जतन व संरक्षण व्हावे या हेतूने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून द्रोणागिरी गडावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेने यासाठी पुढाकार घेऊन ही मोहीम यशस्वी केली.

राज्याचे वने व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी योजना राज्यातील हेरिटेज ट्री (प्राचीन वृक्ष) यांच्या संरक्षणासाठी आवश्यक कृतीकार्यक्रम राबविण्याकरिता आणि महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, 2021 आणलेले आहे. या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी तसेच द्रोणागिरी शहर शाखेने द्रोणागिरी गडावर प्राचीन वृक्षांचे जतन व संरक्षण व्हावे या हेतूने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून मोहीम आखली होती. या मोहिमेत असंख्य शिवसैनिकांनी व नागरिकांनी सहभाग घेतला होता.

ही मोहीम शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पाटील, शिवसेना द्रोणागिरी युवा अधिकारी करण पाटील, शिवसेना द्रोणागिरी उपशहर प्रमुख प्रतीक पाटील व शिवसेना द्रोणागिरी सचिव धनंजय शिंदे व अनेक मान्यवर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, दि. 4 जुलै रोजी भल्या पहाटे जय भवानी जय शिवाजी जयघोषात पार पाडली.

Exit mobile version