एकमेव वास्तूची देखील पडझड; उरणकरांकडून डागडुगीची मागणी
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील द्रोणागिरी पर्वतावरील किल्ला आज शेवटची घटका मोजत आहे. तीन किलोमीटर पर्यंत विस्तार असलेल्या या किल्ल्यावर आज एकच वास्तू आपल्या इतिहासाची साक्ष देत उभी आहे. तर, इतर वास्तू आणि किल्ला नामशेष झाला आहे. उरणकरांना आणि पुढच्या पिढ्यांना इतिहासाची माहीती होण्यासाठी येथील उरलेसुरले अवशेष जपले जावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रभू राम आणि रावण यांच्यात झालेल्या युद्धात लक्ष्मणाला बाण लागून लक्ष्मण मूर्छित पडले. त्यांच्या उपाचारासाठी संजीवनी आणायला गेलेल्या हनुमंताने द्रोणागिरी पर्वतच उचलून आणल्याच्या कथा आपण ऐकत आलो आहोत. त्याच द्रोणागिरी पर्वताचा एक भाग उरणच्या भूमीत पडला. आणि आज तो दिमाखात द्रोणागिरी पर्वत म्हणून उभा असल्याची धारणा येथील प्रत्येक माणसाच्या मनात आहे. याच द्रोणागिरी पर्वतावर सुमारे बाराशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेला द्रोणागिरी किल्ला आपल्या इतिहासाच्या शेवटच्या घटका मोजत आहे. शिलाहर काळात हा किल्ला बांधला गेला असल्याच्या खुणा येथे सापडत आहेत. तर, या किल्ल्यावर अनेक शासकांनी शासन केले असून, आरबी समुद्रातून होणारे आक्रमण रोखण्यामध्ये या किल्ल्याची प्रमुख भूमिका होती. अनेक बदल, युद्ध, रक्तपत आणि सत्ता बदल पाहिलेला हा किल्ला आज शासकीय अनास्था आणि दुर्लक्षपणामुळे संपूर्ण नष्ट झाला आहे. 1530 ते 1535 या काळात पोर्तुगीजांच्या अम्मलाखाली आलेल्या या किल्ल्यावर पोर्तुगीजांकडून बांधलेल्या काही इमारतींमधील आज एक इमारत निसर्ग आणि इतर परिस्थितीशी झुंज देत आपला इतिहास ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या किल्ल्यावरील शिल्लक राहिलेल्या एकमेव वास्तूची देखील मोठ्या प्रमाणावर पडझड होत आहे. त्यामुळे या किल्ल्याचे उरलेल्या अवशेषाकडे शासनाने लक्ष केंद्रित करावे आणि उरणच्या इतिहासातील महत्वाचा आणि दुर्लक्षित इतिहास सुरक्षित करावा, अशी मागणी उरणकर करत आहेत.







