| उरण | वार्ताहर |
द्रोणागिरी नोड परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. जागोजागी खड्डे पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरी सिडकोने सदर रस्त्याची पाहणी करून खड्डे युक्त रस्ते खड्डे मुक्तकरण्यासाठी मोहीम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
सिडको व्यवस्थापन द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी करोडो रुपयांचा निधी खर्च करत आहेत. परंतु ठेकेदार व अधिकारी वर्ग हे संगनमताने अर्थकारण करून निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करत आहेत. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यांची दरवर्षी दुरावस्था होत आहे. त्यामुळे नवघर उड्डाण पूल, पागोटे, भेंडखळ, करंजा जेटी, सेक्टर 51 ते 54 या परिसरातील रस्त्यातून जाताना-येताना प्रवासी नागरिक, वाहन चालक यांना त्रास सहन करावा लागत आहे.
तरी सिडकोचे व्यवस्थापकीय अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी उरण, द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांच्या समस्यांकडे जातीने लक्ष घालून यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी प्रकल्पग्रस्त नागरीक करत आहेत.