। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव पोलीस ठाणे हे कोकणमध्ये सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत वसलेले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उंचच्या उंच डोंगररांगा असून, खोल दर्या आहेत. पुणे ते माणगाव शहराला जोडणारा अतिशय कठीण असा ताम्हिणी घाट आहे. कोकणात येणार्या पर्यटकांची संख्या जास्त असल्याने वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ताम्हिणी घाटात गंभीर अपघातांचे प्रमाण अधिक असून जीवितहानीही अधिक आहे. वाहन दरीत किंवा जंगलात पडल्यास, वाहन व व्यक्तीचा त्वरित शोध घेणे शक्य होत नाही आणि त्यामुळे पीडितांपर्यंत योग्य वेळी मदत पोहोचू शकत नाही.
या सर्व बाबी व समस्या लक्षात घेऊन अल्ताफ दाउद गंगरेकर रा. मोबी यांनी माणगाव पोलीस ठाण्याला डीजेआय मिनी प्रो कंपनीचा ड्रोन कॅमेरा भेट दिला आहे. तसेच या ड्रोन कॅमेराच्या मदतीने ताम्हीणी घाटातील अपघातग्रस्त वाहन व व्यक्ती यांना लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळणार आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील होणारी वाहतूक कोंडी ड्रोन कॅमेराच्या मदतीने कोंडी नियंत्रणात आणण्यास उपयोग होणार आहे.