। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या देण्यात येणारा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून फिनोलेक्स महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आला.
महाविद्यालयाची युवा ब्रँड अँम्बेसेडर मनस्वी नाटेकर हिने हा पुरस्कार महाविद्यालयाच्यावतीने स्वीकारला. महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाकडून नवमतदार नोंदणी अभियानाचे आयोजन केले जात होते. जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने महाविद्यालयात नवमतदार नोंदणी अभियान, अभिरूप मतदान कार्यक्रम, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हास्तरीय विविध स्पर्धा, मतदार जनजागृतीपर कार्यशाळांचे आयोजन केले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. मतदार नोंदणी आणि जनजागृतीसंदर्भात प्रा. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर केला.
राज्यशास्त्र विभागाने आतापर्यंत जे उत्तम कार्य केले आहे त्याची फलश्रुती म्हणजे महाविद्यालयाला मिळालेला हा पुरस्कार आहे. भविष्यात आपण निश्चितच अधिकाधिक चांगले काम करून या राष्ट्रीय कार्यास हातभार लावू.
डॉ. मकरंद साखळकर, प्राचार्य