पालीत मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य सत्कार
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याची वाट लावून टाकू, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइं (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी पाली येथे दिला. मंत्रीपदाच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व जाती-धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम पक्ष करीत असल्याचे आठवले यांनी सांगितले. तुमचं गाव आहे पाली, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले वाली,’ असेही त्यांनी यावेळी म्हटले.
रिपाइं (आठवले), सुधागड तालुक्याच्या वतीने पालीतील लिमये हॉलमध्ये रविवारी हा सत्कार सोहळा झाला. यानिमित्त पाली शहरातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. आठवले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाला सीमा आठवले, अविनाश महातेकर, राजाभाऊ सरोदे, गौतम सोनावणे, प्रकाश मोरे, नरेंद्र गायकवाड, राहुल सोनावळे यांच्यासह रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी राहुल सोनावळे आणि भावेश गायकवाड यांनी सांभाळली.






