| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून शेती, पर्यावरण, आरोग्य, स्वावलंबन आणि श्रमाचे महत्त्व समजावे, या उद्देशाने जि.प. शाळा दिघेवाडी, ता. सुधागड येथे शालेय परसबाग हा उपक्रम उत्साहात राबविण्यात येत आहे. सन 2026-27 मध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शाळेच्या परिसरात टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, पालक, वांगी अशा विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे.
या परसबागेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जमीन तयार करणे, वाफे तयार करणे, बियाणांची पेरणी, रोपांची लागवड, पाणी व्यवस्थापन, तण काढणे, सेंद्रिय पद्धतीने निगा राखणे व काढणीचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव विकसित होत आहे. या परसबागेत उत्पादित होणाऱ्या ताज्या आणि पौष्टिक भाज्यांचा उपयोग शालेय पोषण आहारासाठी करण्यात येत असून, ‘आपण पिकवलेले अन्न आपणच खातो’ या भावनेतून अन्नाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजत आहे. विशेष म्हणजे, उत्पादित भाजीपाल्याची विक्री विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बाजारात करून स्वावलंबन, व्यवहारज्ञान, आर्थिक साक्षरता आणि संवादकौशल्याचा अनुभव घेतला. उत्पादनापासून विक्रीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी स्वतः हाताळली. हा उपक्रम मुख्याध्यापक संजय थळे, संगीता अवताडे आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून पालक व ग्रामस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे. ‘पिकवा, शिका आणि निरोगी राहा’ हा संदेश देणारी ही परसबाग इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.







