आता अवैध मासेमारीवर ड्रोनची नजर

वरसोली आणि मुळगांव किनारी उपक्रम; गस्ती नौकांना होणार फायदा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

कोकणातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. रायगडसह कोकणातील सात जिल्ह्यातील सागरी किनारी सात ड्रोन कंट्रोल नियंत्रण कक्षामार्फत नऊ अत्याधुनिक ड्रोनची नजर राहणार आहे. अशा पध्दतीची आधुनिक यंत्रणा प्रथम अंमलात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील वरसोली समुद्रकिनार्‍याकडील क्रिकेट मैदान व श्रीवर्धन तालुक्यातील मुळगांव बंदर येथून ड्रोन प्रणालीचे उड्डाण करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय संजय पाटील यांनी दिली. आहे.

महाराष्ट्र राज्याच्या जलधीक्षेत्रात होत असलेली अवैध मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 (सुधारीत 2021) हा कायदा अंमलात आला आहे. या सागरी मासेमारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता विभागाकडेअसलेल्या गस्ती नौकांमार्फत गस्त घालून कार्यवाही करण्यात येत असते. गस्ती नौकेद्वारे समुद्रात गस्त घालत असताना प्रत्येक नौकेची तपासणी करणे शक्य होत नाही. तसेच अनधिकृत नौकांचा पाठलाग करीत असताना त्या पळून जात असतात. अशा नौकांना पकडणे जिकरीचे होत असते.

अनधिकृत मासेमारीवर आळा घालून शाश्‍वत मासेमारी टिकून ठेवण्याच्या दृष्टीने, राष्ट्रीय सागरी सुरक्षा व सुरक्षिततेच्या दृष्टीने समुद्रात ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्याचे काम केले जाणार आहे. मासेमारीचे नियमन करण्याकरीता ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली भाडयाने घेण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्याच्या 122 किमी लांबीच्या समुद्र किनार्‍यापासून राज्याच्या सागरी हद्दीपर्यंत म्हणजे 12 सागरी मैल अंतरापर्यंत ड्रोनद्वारे संशयीत हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे. ड्रोन प्रणालीद्वारे अनाधिकृत मासेमारी करणार्‍या नौकांवर नजर ठेवून अशा नौकांची माहिती पुराव्यासह उपलब्ध करून कार्यवाही करण्याकरिता ड्रोन प्रणालीच्या वेबसोलूशन, स्ट्रिमींगचा पुरावा म्हणून वापर करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा व श्रीवर्धन या दोन ठिकाणी सदरची सेवा भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन घेण्यात आली आहे. आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. राज्यातील रायगडसह पालघर, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील 09 ठिकाणी ड्रोन प्रणालीचे उड्डाण व आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उदघाटन 09 जानेवारीला होणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी दिली.

सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी ठरणार फायदेशीर
अनधिकृत मासेमारी करणार्‍या नौकांची पुराव्यासह माहिती विभागास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. अशा नौकांवर सागरी कायद्याअंतर्गत कठोरपणे कारवाई करणे सोईचे होईल. ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिकचे क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येण्यास मदत होणार आहे. ड्रोनचा वापर करुन मासेमारी नौकांची करुन झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागास सुलभरित्या उपलब्ध होवू शकेल, ड्रोनद्वारे राज्याच्या किनारपट्टीवरील क्षेत्र देखरेखीखाली येणार असुन उक्त वापरण्यात येणारे ड्रोन हे सागरी पोलीस विभागाशी समन्वय साधुन वापरण्यात येणार आहेत, जेणे करुन सागरी सुरक्षा बळकट होण्यास सुध्दा मदत होईल.
Exit mobile version