औषधांची नशा, तरुणांची दुर्दशा

सामाजिक आजारपण फोफावण्याची तज्ज्ञांना भीती

| रायगड | आविष्कार देसाई |

अमली पदार्थांची तस्करी आणि वापर करण्याबाबत अमली विरोधी पथकाने कडक पावले उचलली आहेत. नशा करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या विविध पदार्थांवर निर्बंध आले आहेत. आता नशा कोणत्या पदार्थाने करायची याचे उत्तर नशेड्यांनी शोधून काढले आहे. औषधांच्या दुकानात सहज उपलब्ध होणारे औषध म्हणजे खोकल्याचे औषध होय. या औषधांचा वापर नशा करणासाठी सध्या केला जात असल्याने सामाजिक आजारपण निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या औषधांचे अधिक सेवन हे आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे.

नशा करून आपल्याच विश्‍वात रमणारे सध्या खोकल्याच्या औषधांवर आपली नशा भागवत आहेत. खोकल्याचे औषध कोणत्याही मेडिकलच्या दुकानामध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय सहज मिळते. त्यामुळे काही मेडिकलच्या दुकानामध्ये सर्वात जास्त खोकल्याच्या औषधांची विक्री होते. कोडीन नावाचा घटक द्रव्य त्यामध्ये असतो. त्याचे अधिक सेवन केल्यास नशा येते. आता तर ही गोष्ट सर्वांनाच माहीत झालेली आहे. शाळा-कॉलेजात जाणारे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खोकल्याच्या औषधांचा वापर नशा आणणार्‍या पदार्थासारखा करायला लागले आहेत. याचे अतिसेवन केल्याने शरीरावर दुष्परिणाम होतात.

केमिस्टकडे खोकल्याच्या औषधांचा (कफ सिरप) खपही वाढल्याचे बोलले जाते. हा खप वाढण्यामागे नेमके सर्दी-खोकला हेच कारण नसून, याचा औषध म्हणून कमी तर नशेसाठी अधिक वापर होत असल्याचे चित्र आहे. नशेड्यांसह उच्चभ्रू तरुणांमध्ये खोकल्याच्या औषधांची मागणी वाढली असून, विविध सेलिब्रेशनच्या पाटर्यांमध्येही याचा वापर होत असल्याचे आता लपलेले नाही.

कोडीनमुळे त्या व्यक्तीच्या मेंदूवर गंभीर परिणाम होतात. हे माहीत असूनसुद्धा कोडीनग्रस्त लोक वरचेवर त्याचे सेवन करत राहतात. एखाद्या दारूच्या दुकानात जाऊन दारूची बाटली खरेदी करण्यापेक्षा औषधाच्या दुकानात जाऊन खोकल्याचे औषध खरेदी करणे सोपे असते. परंतु, औषधाचे दुकानदार आता सावध झालेले आहेत. एखादी व्यक्ती सातत्याने खोकल्याचे औषध खरेदी करायला लागली की दुकानदारही औषधाची मागणी औषध म्हणून नसून, ती नशा करण्यासाठी आहे हे आता ओळखायला लागले आहेत. त्यामुळे अशा विक्रीवर हळूहळू चेक बसत आहे.

खोकल्याच्या औषधामध्ये कोडीन नावाचे घटक द्रव्य असते. त्यामुळे त्याचे जास्त सेवन केल्यास नशा येते. खोकल्याचे औषध हे अन्य नशा करणार्‍या पदार्थांपेक्षा तुलनेत स्वस्त मिळते. त्यामुळे याची जास्त नशा केल्याने शरीर आणि मेंदूवर संतुलन राहात नाही. नशेची सवय झाल्याने नशा करण्यास मिळाली नाही, तर ते हिंसक अथवा त्यांच्या हातून गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खोकल्याचे औषध हे अन्य नशा करणार्‍या पदार्थांपेक्षा तुलनेने स्वस्त मिळते. प्रिस्क्रिप्शनशिवाय सहज उपलब्ध होत असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. खोकल्याच्या औषधांचे अतिसेवन ही नशा आहे. याची माहिती पालकांना असतेच असे नाही. तसेच दारू किंवा ड्रग्जप्रमाणे दुर्गंधी येत नाही. त्यामुळे खोकला आहे असे सांगून पालकांची फसवणूक करण्याचे प्रकार घडतात. या अतिसेवन केल्याने जीवावरही बेतू शकते.

दरम्यान, नशा करणार्‍यांना नशा करण्यासाठी पदार्थ उपलब्ध झाला नाही, तर ते खोकल्याचे औषध, अन्य गोळ्यांचा वापर करतात. मात्र, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतीच औषधे दुकानदार देत नाहीत, असा दावा मेडिकल दुकानदारांनी केला आहे.

नशा करण्यासाठी विविध औषधांचा वापर करण्यात येतो. नशा करणार्‍यांना सातत्याने नशा करण्याची सवय लागलेली असते. त्यांना नशा करण्यास मिळाली नाही, तर बेचेन होतात. यासाठी खोकल्याची औषध नशा करण्यासाठी वापरली जातात. तरुण पिढीला बरबादीपासून रोखायचे असेल तर, त्यांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. तसेच औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देऊ नये. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

डॉ. आंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

तरुण पिढी आपल्या देशाची ताकद आहे. त्यांच्यावर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. पालक आणि पाल्य यांच्यातील संवाद तुटत चालला आहे. युवक व्यसनाच्या आहारी गेल्यास देशाचे भवितव्य अंधकारमय आहे. 16 ते 30 या वयोगटात अशा व्यसनाचे प्रमाण दिसून येते. यातून सामाजिक आजारपण फोफावण्याचा अधिक धोका आहे. व्यसनाधिनता रोखण्यासाठी सर्वांनी एक मिशन म्हणून काम करणे गजेचे आहे.

शीतल कांबळे, समुपदेशक
Exit mobile version