खारघर परिसरातील उद्यानात अमली पदार्थांचे सेवन

| पनवेल | वार्ताहर |

खारघर परिसरातील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने अमली पदार्थांचे सेवन करण्यात येत आहे. तर काही उद्यानात मद्याच्या बाटल्यांचा खच दिसून येत आहे. काही उद्यानातील खेळणी तुटलेली असल्याने बच्चेकंपनीची गैरसोय होत आहे.

खारघर शहर निर्माण करताना सिडकोने सेक्टर निहाय उद्यान तसेच मैदान उभारले आहेत. सिडकोकडे असताना उद्यानाची देखभाल करण्यासाठी माळी कामगार हे कुटुंबासह उद्यानात राहत होते. मात्र पनवेल महापालिका अस्तिवात आल्यामुळे सिडकोने उद्यान आणि मैदान पालिकेकडे हस्तांतरण केली आहेत. मात्र त्यानंतर उद्यानाची द्रवस्था होऊ लागली आहे. उद्यानात काही वेळेपुरतेच सुरक्षा रक्षक असल्यामुळे अन्यवेळी गर्दुल्ल्यांकडून अमली पदार्थांचे सेवन केले जाते. तर काही उद्यानात प्रेमी युगुलाचे अश्‍लील चाळे सुरू असतात. उद्यानात सुरक्षा रक्षक नसल्याची संधी साधून मद्यपी संरक्षण भिंत आणि संरक्षण जाळी ओलांडून उद्यानात प्रवेश करून मद्यपान करतात. तर दारूच्या बाटल्या, पाण्याची बॉटल, प्लास्टिक पिशवी तेथेच ठेवून पसार होतात. यामुळे उद्याने बकाल झाली आहेत. तर काही उद्यानातील खेळणी तुटली आहेत.

उद्यानात पूजा पाठ
खारघर सेक्टर एकवीसमधील उद्यानात काही खेळणी मोडकळीस आली आहेत. या खेळणीपासून दहा फूट अंतरावर दगडाची पूजा पाठ करण्यात आली आहे. तसेच फुलांचा हार घालून नारळ फोडण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Exit mobile version