रोहा पोलिसांची धडक कारवाई; 4,700 लीटर रसायन, 110 लिटर दारू नष्ट
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यात जंगलाचा आडोसा घेत सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मितीविरोधात रोहा पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. अवघ्या दोन दिवसांत तीन ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी 4,700 लिटर दारू निर्मितीचे रसायन आणि 110 लीटर गावठी दारू असा 2 लाख 82 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.
पोलीस निरीक्षक अभय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 23 ऑगस्ट रोजी टिटवीजवळील जंगलात छापा टाकून 2,400 लीटर रसायन, साहित्य आणि 10 लीटर तयार दारू नष्ट करण्यात आली. या मुद्देमालाची किंमत सुमारे 1 लाख 57 हजार रुपये आहे. 22 ऑगस्ट रोजी केळघर जंगलात केलेल्या कारवाईत 2,200 लीटर रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. याप्रकरणी चंदा झोरे, ललिता गोरे आणि रंजना गोरे यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे. तर धामनसई येथे विक्रीसाठी ठेवलेली 100 लीटर गावठी दारू पोलिसांनी हस्तगत केली असून, उत्तम शेवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग तीन कारवायांमुळे जंगलाच्या आडोशाने हातभट्ट्या चालविणाऱ्यांना मोठा दणका बसला असून, अवैध दारू व्यवसायाविरोधातील कारवाई आणखी तीव्र होण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.






