। मुंबई । प्रतिनिधी ।
कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांचे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या साकीनाका पोलिसांच्या पथकावर एका अंमली पदार्थ विक्रेत्याने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एका पोलीस उपनिरीक्षक व एका पोलीस शिपायाला किरकोळ दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपीने स्वत:वरही वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आतिक खान (27) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीचे जाळे उघडकीस आणले होते. एप्रिल महिन्यात साकिनाका पोलिसांनी वसई पूर्वेच्या कामण येथे अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून 4 किलो 53 ग्रॅम वजनाचे 8 कोटी रुपयांचे एमडी (मॅफेड्रॉन) हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
या प्रकरणात सलीम शेख उर्फ सलीम लंगडा (45) या मुख्य आरोपीला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून कर्नाटकच्या म्हैसूर येथे छापा टाकून 187 किलो एमडी हे अमली पदार्थ जप्त केले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार एकूण किंमत 381 कोटी रुपये आहे. याप्रकरणात मुंबईतील आतिक खान याचा समावेश असल्याची माहिती मिळाली.आतिक खान नावाचा आरोपी अंधेरी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि. 24) पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी डी.एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला. त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच आतिकने त्याच्याकडील चाकू काढून पोलिसांना धमकावले व हल्ला केला. या झटापटीत उपनिरीक्षक शशिकांत पाटील (51) आणि पोलीस शिपाई पंकज परदेशी (38) यांना किरकोळ दुखापत झाली. अखेर पोलिसांनी आरोपीवर नियंत्रण मिळवून त्याला अटक केली. आरोपी आतिक खान याला न्यायालयाने त्याला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.







