‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

क्यूआर कोडद्वारे शपथ, जनजागृती रॅलीत प्रवाशांचा सहभाग

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने ड्रग फ्री मुंबई जनजागृती अभियानाअंतर्गत गुरुवार दि.30 जुलै रोजी पनवेल रेल्वे स्थानक परिसरात जनजागृती कार्यक्रम पार पडला. क्यूआर कोड स्कॅनकरून अंमली पदार्थविरोधी शपथ घेण्यासह रेल्वे स्थानक परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली.

नवीन बुकिंग हॉल परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचारी, रेल्वे प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला दक्षता समितीचे सदस्य, पोलीस मित्र आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थितांनी क्यूआर कोड स्कॅन करून ड्रग फ्री मुंबईची शपथ घेत अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृतीचा संदेश दिला.

त्यानंतर सर्व सहभागींच्या उपस्थितीत रेल्वे स्थानक परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली. या अभियानाचा उद्देश अंमली पदार्थमुक्त मुंबई घडविणे, रेल्वे प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस अधिकारी, 40 पोलीस अंमलदार, पाच पोलीस मित्र सदस्य तसेच मोठ्या संख्येने रेल्वे प्रवासी उपस्थित होते. कार्यक्रमाला रेल्वे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Exit mobile version