खारघरमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

244 ग्रॅम गांजा, 3.5 ग्रॅम एमडी जप्त; महिलेसह तिघे अटकेत

| कळंबोली | प्रतिनिधी |

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत येणाऱ्या अमली पदार्थविरोधी कक्षाने खारघर परिसरात धडक कारवाई करत अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा दणका दिला आहे. बेलपाडा आणि कोपरा गाव परिसरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी 244 ग्रॅम गांजा आणि 3.5 ग्रॅम एमडी असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत महिलेसह तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, एक संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे.

बेलपाडा परिसरातील कारवाईत पोलिसांनी अफसाना बी.अजीज शेख (50) आणि फैजान अब्दुल वाहिद अन्सारी (25) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 17 ग्रॅम गांजा आणि 3.5 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. तर कोपरा गावात केलेल्या कारवाईत अनुसया बराल (50) हिच्याकडून तब्बल 227 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला. अशा प्रकारे दोन्ही कारवायांमध्ये एकूण 244 ग्रॅम गांजा व 3.5 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. दरम्यान, कोपरा गावातील कारवाईदरम्यान जलालुद्दीन नावाचा संशयित आरोपी पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त करण्यात आलेले ड्रग्ज आणखी कुठून आणि कोणाच्या माध्यमातून आले, तसेच या प्रकरणामागे मोठे तस्करीचे जाळे आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version