| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड शहरातील तरुणांकडे अमली पदार्थ सापडल्याची घटना समोर आली आहे. पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करीत असताना ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुरुड शहरातील तरुण-तरुणी जुनी पेठ येथील खाजणात बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार पोलीस उपनिरिक्षक अविनाश ढाकरे, पोलीस नाईक सुरेश वाघमारे, परेश म्हात्रे, पोलीस शिपाई प्रशांत लोहार हे घटनास्थळी पोहोचताच त्याठिकाणी एक तरुण व तरुणी आढळून आली. तसेच त्यांच्याकडे चरस सदृश्य अमली पदार्थ मिळुन आल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड पोलीस निरीक्षक निशा जाधव व पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढाकरे यांनी केली. कोणीही चरस, गांजा तसेच नशा करताना आढळल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढाकरे अधिक तपास करीत असून त्या दोघांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले