52 कोटींचे अंमलीपदार्थ केले नष्ट

| नवी मुंबई | वार्ताहर |

केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) विविध कारवायांमध्ये जप्त केलेले तब्बल 52 कोटी रुपये मूल्य असलेले अंमलीपदार्थ तळोजा येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पात जाळून नष्ट केले. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठीत उच्च स्तरीय समितीने काही निवडक प्रकरणांमध्ये जप्त केलेले अंमलीपदार्थ खटला सुरू होण्याआधी नष्ट करण्याचा निर्णय घेतला.

या समितीत एनसीबीचे उपमहासंचालक मनीष कुमार, एनसीबीचे अतिरिक्त संचालक अमित घावटे आणि मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांचा समावेश आहे. समिती सदस्यांच्या उपस्थितीत तळोजा येथील प्रकल्पात 10 किलो कोकेन आणि 52 हजार 130 कोडेनयुक्त कफ सिरपच्या बाटल्या(5479 किलो) जाळून नष्ट करण्यात आल्या. यातील कोकेन प्रामुख्याने लॅटिन अमेरिकेतून विविध मार्गाने भारतात आणण्यात आले होते. तर कफ सिरपच्या बाटल्या ठाणे, धारावीतील टोळ्यांनी परराज्यातून मुंबई महानगर प्रदेशातील पुरवठ्यासाठी मागविल्या होत्या. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय कोडेनयुक्त सिरप विकू नये, असा नियम आहे. त्यामुळे अवैधरित्या हे सिरप नशेखोराना चढ्या भावात विकले जाते.

Exit mobile version