| पनवेल । वार्ताहर ।
खारघर,सेक्टर – 4 मधील पान शापमधून छुप्या पध्दतीने ई-सिगारेट आणि विदेशी सिगारेटची विक्री करणार्या व्यक्तीला पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारुन अटक केली आहे. मिथलेश माणिकचंद साहु (39) असे या पान शॉप चालकाचे नाव असून अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्या पान शॉप मधून सुमारे 45 हजार रुपये किंमतीचे ईसिगारेट आणि विदेशी सिगारेट जप्त केले आहेत.
खारघर, सेक्टर 4 मधील भूमी टावर येथील सौरभ पान शॉपमधून ई-सिगारेट आणि विदेशी सिगारेटची विक्री करण्यात येत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. सय्यद आणि त्यांच्या पथकाने भूमी टॉवर मधील सौरभ पान शॉपवर छापा मारला.
यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथकाने तपासणी केली असता, पान शॉपमध्ये वेगवेगळ्या कंपनींचे अणि फ्लेवरचे सुमारे 45 हजार रुपये किमतीचे ई-सिगारेट तसेच वेगवेगळ्या कंपन्यांची विदेशी सिगारेटची पाकीटे सापडली. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सौरभ पान शॉप चालक मिथलेश साहु याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा त्याचप्रमाणे कॉफ्टा कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन एकूण ई-सिगारेट आणि विदेशी सिगारेट जप्त केले.