| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून नशामुक्तीसाठी पोलीस दल सातत्याने कारवाई करत असल्याने गेल्या 32 महिन्यात 1831 गुन्हे दाखल करून 2,854 गुन्हेगारांना पकडण्यात आले. या धरपकडीत 70 कोटी 18 लाखांचा मुद्देमाल पोलीस दलाने जप्त केला. वारंवार जप्त केलेले अमली पदार्थ हे शास्त्रोक्त पद्धतीने तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीतील भस्मीकरणाऱ्या यंत्रात जाळून त्याची होळी केली जाते. अशाच पद्धतीचा कार्यक्रम शक्रवारी नवी मुंबई पोलीस दलाने आयोजित केला. या कार्यक्रमात 26 कोटी 48 लाखांचा अमली पदार्थांचा साठा भस्मीकरण यंत्रात टाकून तो साठा खाक करण्यात आला.
नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या कारकिर्दीत गेल्या अडीच वर्षांपेक्षाच्या अधिकच्या काळात नशामुक्ती नवी मुंबई अभियान सर्वच पोलीस दलाने हाती घेऊन त्यावर कठोर अमलबजावणी केली. दोन वर्षात आतापर्यंत 38 कोटी रुपयांचा अमली पदार्थाचा साठा जप्त करून तो साठा तळोजा येथील भस्मीकरण यंत्रात जाळून होळी कऱण्यात आली. याच कारवाईचा भाग म्हणून शुक्रवारी 26 कोटी 48 लाख रुपयांचे अमली पदार्थ तळोजा येथील रामकी ग्रुपच्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या भस्मीकरण यंत्रात टाकण्यात आले. नवी मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून नशामुक्तीसाठी पोलीस दल सातत्याने कारवाई करत असल्याने गेल्या 32 महिन्यात 1831 गुन्हे दाखल करून 2,854 गुन्हेगारांना पकडण्यात आले. या धरपकडीत 70 कोटी 18 लाखांचा मुद्देमाल पोलीस दलाने जप्त केला.
गेल्या अडीच वर्षांच्या काळात अमली पदार्थाच्या तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये 101 आफ्रिकन नागरीकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडुन 40 कोटी रुपयांचा अंमली पदार्थाचा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच नवी मुंबई मध्ये अवैधरित्या राहत असलेल्या आफ्रिकन नागरीकांवरील कारवाईत 2034 आफ्रिकन नागरीकांना भारत देशातुन हद्दपार करुन त्यांना परत त्यांच्या देशात पाठविले आहे. त्यापैकी 989 आफ्रिकन नागरीकांची नावे पारपत्र विभागाव्दारे काळ्या यादीत टाकण्यात आली आहेत.





