14 पाकिस्तानी तस्कर ताब्यात
| गुजरात | वृत्तसंस्था |
गुजरातच्या किनारपट्टीलगत पुन्हा कोट्यवधींचे ड्रग्स पकडण्यात आले आहे. भारतीय तटरक्षक दलाने गुप्तचरांच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन केले. ज्यामध्ये पाकिस्तानी बोटीच्या 14 कर्मचाऱ्यांसह 602 कोटी रुपयांचे सुमारे 86 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
गुजरातच्या किनारपट्टीलगत पुन्हा कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि तटरक्षक दल यांनी संयुक्त कारवाई करत गुजरातच्या किनारपट्टीवरून 86 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. बाजारात त्याची किंमत अंदाजे 602 कोटी रुपये इतकी आहे. या कारवाईदरम्यान 14 पाकिस्तानी तस्करांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईदरम्यान अटक टाळण्यासाठी बोटीवरील तस्करांनी एटीएस अधिकाऱ्यांवर बोट चढवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रत्युत्तरादाखल पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली. सुरक्षा यंत्रणेतेर्फे गेल्या दोन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ भारतीय जलक्षेत्रात शोध मोहीम राबवण्यात येत होती.
लोकसभा निवडणुकीत गुजरात पोलीस वेगवेगळ्या पॅरामीटरवर काम करत आहेत. पाकिस्तानी नागरिक हाजी अस्लम याने पाकिस्तानी मासेमारी बोटीतून ड्रग्ज पाठवल्याची माहिती गुप्तचरांमार्फत 21 एप्रिल रोजी एटीएस अधिकाऱ्यांना मिळाली होती. ते तामिळनाडूमार्गे श्रीलंकेला जाणार होते. भारतीय तटरक्षक दलाने दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांच्या सहकार्याने यशस्वी ऑपरेशन केले. या मोहिमेसाठी भारतीय तटरक्षक दलाची जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली होती. एनसीबी आणि एटीएस अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या राजरतन या आयसीजी जहाजाने संशयास्पद बोट ओळखली. अंमली पदार्थांनी भरलेल्या बोटीच्या चालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तटरक्षक जहाज राजरतनने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला आणि पाकिस्तानी बोटीच्या 14 कर्मचाऱ्यांसह 602 कोटी रुपयांचे सुमारे 86 किलो अमली पदार्थ जप्त केले.
या कारवाईच्या एक दिवस आधी, एनसीबीने गुजरात आणि राजस्थानमध्ये ‘म्याऊ म्याऊ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मेफेड्रोन या प्रतिबंधित औषधाची निर्मिती करणाऱ्या तीन लॅबचा पर्दाफाश केला आणि 7 जणांना अटक केली. तसेच सुमारे 300 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते.