| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील शिघ्रे चेक पोस्ट ठिकाणी रात्रीच्या वेळी मुरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हरी मेंगाळ, पोलीस नाईक किशोर बठारे, पोलीस जनार्दन गजबळे आदिंसह पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. त्याचवेळी त्या रस्त्यावरुन सुझुकी मोटारसायकलवरुन एक तरुण मुरुडच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्याला थांबवले. त्यावेळी त्याची झडती घेतली असता गाडीच्या डिकीत 776 ग्राम वजनाचा एकूण 4 लाख 8 हजार रुपये किंमतीचा चरस अमली पदार्थ आढळुन आला. त्या तरूणाला तात्काळ अटक करुन मुरुड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पुढील तपास मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख करित आहेत.







