रसायनीत सहा लाखांचे अंमली पदार्थ जप्त

| रसायनी | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा औद्योगिक परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धाडसी कारवाई करत अफूसदृश्य अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 42.735 किलो अफूसदृश्य पावडर हस्तगत करण्यात आली असून, तिची अंदाजे किंमत 6 लाख 41 हजार 026 रुपये इतकी आहे.

कैरे गाव हद्दीतील वाशिवली-पाताळगंगा मार्गावर, बॉम्बे डाईंग कंपनीसमोर उभ्या असलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकमध्ये अंमली पदार्थ असल्याची खात्रीलायक माहिती सहाय्यक फौजदार संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून वाहनाची तपासणी केली. तपासादरम्यान प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये अफूसदृश्य पावडर आढळून आली. याप्रकरणी प्रेमसिंग हरदमसिंग (64) व जैस्वाल जयराम सिंग (वय 72), दोघे रा. पंजाब, यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईदरम्यान सुमारे 8 लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त करण्यात आला असून, एकूण 14 लाख 41 हजार 026 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासात पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील, सहाय्यक फौजदार संदीप पाटील तसेच पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version