भीषण अपघात! डंपरने नऊ जणांना चिरडले; तिघांचा मृत्यू

6 जण गंभीर जखमी

। पुणे । प्रतिनिधी ।

पुण्यात रविवारी (दि. 22) रात्री एका मद्यधुंद डंपर चालकाने 9 लोकांना चिरडले. या भीषण अपघातात दोन बालकांसह तिघांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी डंपरचालकाला अटक केली असून त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील वाघोली चौकात केसनंद फाट्यावर रविवारी रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अमरावतीचे रहिवासी असलेले काही मजूर रात्रीच्या सुमारास या भागात फूटपाथवर झोपले होते. त्याचवेळी भरघाव डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर या अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातावेळी डंपरचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी डंपरचालक गजानन शंकर तोट्रे (26) रा. नांदेड याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल विनोद पवार (22) रा. अमरावती, वैभवी रितेश पवार (1 वर्ष), वैभव रितेश पवार (2) अशी मृतांची नावे असून जानकी दिनेश पवार (21), रिनिशा विनोद पवार (18), रोशन शशादू भोसले (9), नगेश निवृत्ती पवार (27), दर्शन संजय वैराळ (18), आलिशा विनोद पवार (47) हे गंभीर जखमी झाले आहेत.

Exit mobile version