| ठाणे | प्रतिनिधी |
मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या पादचारी पूलावर दोघांनी डोंबिवलीतील एका प्रवाशावर ब्लेडने वार करुन त्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांपैकी एकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
डोंबिवली येथील गांधीनगर कॉलनी परिसरात जखमी 30 वर्षीय तरुण राहतो. तो डोंबिवली येथील एका शाळेच्या उपाहारगृहामध्ये काम करतो. मंगळवारी सकाळी तो मुंब्रा येथे त्याच्या मित्राला भेटण्यासाठी आला होता. त्यामुळे तो मुंब्रा स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूलावर उभा राहून मित्राची वाट पाहत होता. त्याचवेळी दोन तरुण त्याच्या दिशेने आले. मुंब्रा स्थानकात मोबाईल चोरी झाला आहे, तो मोबाईल आम्हाला दे, अशी मागणी त्यांनी तरुणाकडे केली. त्यानंतर त्यांनी तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांपैकी एकाच्या हातामध्ये ब्लेड होती. त्याने तरुणाच्या हातावर ब्लेडने वार केले. घटनेची माहिती मुंब्रा स्थानकातील पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तरुणाला वाचविले. ब्लेडने वार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु, त्याचा सहकारी तेथून पळून गेला. जखमी तरुणाला कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर तरुणाने ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोघेही मद्याच्या नशेमध्ये होते, असा दावा जखमी तरुणाने तक्रारीत केला. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), 2023 चे कलम 118 (1) आणि 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
डोंबिवलीतील रेल्वे प्रवाशावर मद्यपींकडून ब्लेडने वार
