। भिवंडी । प्रतिनिधी ।
भिवंडी शहरातील बालाजी नगर गंगारामवाडी परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. एनडीआरएफकडून ढिगारा उपसून बाजूला करण्याचे आणि अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे बचावकार्य अद्यापही सुरू आहे.
भिवंडी शहरातील बालाजी नगर गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत कोसळली. ही 12 ते 14 वर्ष जुनी असल्याची माहिती मिळत आहे. पालिकेने ही इमारत धोकादायक घोषित केली होती आणि तशी नोटीसही बजावली होती. मात्र तरीही कुठल्याच प्रकारचा स्टेक्चर ऑडिट न करता मालकांकडून या इमारतीचे काम सुरू होते. या इमारतीच्या एका विंगच्या तळमजल्यावर काही पिलर नादुरुस्त झाल्याने त्याची दुरुस्ती केली जात होती. गुरुवारी सायंकाळी सहा वाजतापासूनच इमारतीला तडे जाण्यास सुरुवात झाली होती. रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ही इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले. अथक प्रयत्नांनंतर नऊ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले आहे. तर तीन जण यात गंभीर जखमी झाले आहेत. अजून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असून शोध मोहीम सुरू आहे.







