श्रीवर्धनमध्ये वाहनांचे अपघात चिंताजनक; वाहनाची तपासणी करण्याची मागणी
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात गेल्या काही वर्षात देशाभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरत आहे. येथील शांत समुद्रकिनारा, सफेद वाळू, निसर्गरम्य वातावरण मन मोहून टाकत आहे. परंतु, श्रीवर्धन तालुक्यात गेल्या दोन वर्षांत पर्यटकांच्या वाहनांचे किरकोळ अपघात ते भीषण अपघात ही मालिका बंद होण्याचे नाव घेत नाही. ती अद्यापही सुरू आहे. सतत होणाऱ्या अपघातांत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती अपघात ग्रस्त वाहनांवरील मद्यधुंद अवस्थेतील चालक.
हरिहरेश्वर येथील होम स्टे मालकाशी खोली भाड्या वरुन झालेल्या वादातून पर्यटक चालकाने मालकाच्या बहिणीला चारचाकी वाहनाखाली चिरडल्याची घटना, श्रीवर्धन येथे अल्पवयीन थार चालकाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना तसेच दिवेआगर येथे चारचाकीने दुचाकीला उडवत चालकाला फरफटत नेल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून झालेला मृत्यू, या तिन्ही घटनांतून चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता हे निष्पन्न झाले आहे.
हरिहरेश्वर येथील दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या वाहन तपासणीकरीता काही दिवस महत्त्वाचा ठिकाणी पोलीस ठाण्याकडून चेकपोस्ट उभारण्यात आले होते. परंतु, श्रीवर्धन तालुक्यात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे, ती म्हणजे काही पर्यटन व्यावसायिक आलेल्या पर्यटकांना मद्यपानाची व्यवस्था करीत असल्याची. श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक पर्यटन व्यावसायिक हे प्रशासनाने दिलेल्या नियमावलीनुसार आपला व्यवसाय करीत आहेत. मुंबई व पुणे शहरातील धनदांडग्यांनी तालुक्यात रिसॉर्ट, रेस्टॉरंट थाटून व्यवसाय हा केअर टेकर सोपवला आहे. सदरचे केअर टेकर हे आलेल्या पर्यटकांना मद्यपान पुरवठा करीत असल्याचे बोलले जात आहे.
व्यवसाय केअर टेकरच्या हाती
श्रीवर्धनमधील एका पर्यटन व्यावसायिकाने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, तालुक्या बाहेरून आलेले धनाढ्य इथे रिसॉर्ट व्यवसाय थाटून केअर टेकरकडे सोपवतात. हेच केअर टेकर सर्रास पर्यटकांना मद्य पुरवतात. श्रीवर्धनमधील थार अपघात प्रकरणातील अल्पवयीन तरूण हे आलेल्या रेस्टॉरंटवर दोन दिवस मद्यपान करून गोंधळ घालत होते. स्थानिकांनी ही घटना केअर टेकरच्या कानावर घातली होती. परंतु, त्यांनी दुर्लक्ष केले.






