। ठाणे । प्रतिनिधी ।
कल्याण-डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुल्यांचा वावर वाढला असतानाच आता लोकलमध्येही नशाखोरी राजरोसपणे सुरू आहे. कल्याण, कसारा, कर्जत, टिटवाळा, खालापूर मार्गावरील अनेक लोकलमध्ये काही हुल्लडबाज तरुण ड्रग्जचे सेवन करत असल्याच्या तक्रारी आहेत. आता तर डोंबिवली-सीएसएमटी लोकलमध्ये एक जण नशा करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
रेल्वे स्थानके आणि लोकलमधील नशेखोरीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गर्दुल्यांकडून छेडछाड, हाणामार्यांसारखे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे पोलिसांकडून या गर्दुल्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली होती. मात्र, आता कारवाई थंडावल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, लोकलमधील मालडब्यात एक तरुण दिवसाढवळ्या खुलेआम नशा करत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ डोंबिवलीहून सीएसटीकडे जाणार्या लोकलमधील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अशा गर्दुल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.