तयार भाजी रोपांना पसंती, दोन ते चार रुपयांना रोप
| माणगाव | वार्ताहर |
अवकाळी पाऊस शेतीचे गणित बिघडवत असताना शेतकरी तयार रोपांना पसंती देत असून लांबत असलेल्या भाजीपाला लागवडीच्या उत्पादनाचा कालावधी कमी करत आहेत. तयार रोपांमुळे भाजी लागवडीला होणारा उशीर शेतकरी भरून काढत आहेत. हिवाळ्यात भाजीपाला पिकांची लागवड मोठया प्रमाणावर केली जाते. या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी तयार रोपांना पसंती दिली आहे. यामुळे रोपवाटिकेत तयार झालेल्या रोपांना चांगली मागणी आहे.
पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर ते मे या सात महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतले जाते. साधारणतः दीडशे ते दोनशे हेक्टर शेतीमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन होते. यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबलेल्या पावसामुळे भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना नांगरणी व इतर कामे करण्यास वेळ झाला आहे.यामुळे पिकांचा हंगाम पुढे सरकणार आहे.ही बाब लक्षात घेऊन तालुक्यातील शेतकरी थेट बियाणे लागवड करण्या ऐवजी तयार रोपे लागवड करून लागवडीचा कालावधी कमी करून लवकरात लवकर पीक उत्पादन घेण्यासाठी तयार रोपांच्या लागवडीला पसंती देत आहेत.
पुढे येणारा थंडीचा हंगाम व भाजीपाला पिकाची लागवड लवकर व्हावी या उद्देशाने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जमिनीत बियाणांची लागवड न करता तयार रोपांना पसंती दिली आहे. या वर्षी रोपवाटीकेमधून वांगी, मिरची ,टोमॅटो व इतर भाज्यांची तयार रोपे विकत घेऊन शेतामध्ये लागवड करीत आहेत. काही शेतकरी पुणे व इतर शहरातून तयार कलिंगड, आदी फळांची रोपे आणून लागवड करत आहेत. ही रोपे 20 ते 40 दिवसांची आहेत . रोपे प्रति 2 रुपये व पुढे अशी मिळत असून शेतकरी मोठ्या प्रमाणात ही रोपे खरेदी करत आहेत. सरी वाफे तयार करून रोपवाटिकेतील ही रोपे लागवड केल्याने पिकाच्या उत्पादनास लवकर सुरुवात होईल व पावसामुळे बियाणे लागवड करण्यास झालेला उशीर तयार रोपांमुळे भरून निघेल असे शेतकरी सांगत आहेत. गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील प्रगत शेतकरी तयार रोपांना पसंती देत असले तरी यावर्षी लांबलेल्या पावसामुळे अनेक शेतकरी तयार रोपे लागवड करीत आहेत. रोपवाटिकांनाही व्यवसायाचे एक नवे साधन उपलब्ध झाले असून दोन ते चार रुपयांना विविध बियाण्यांची तयार रोपे विक्रीस उपलब्ध आहेत. तालुक्यात साधारणपणे दीड ते दोन लाख तयार रोपे विकली गेली असून पुढील काळात अजून विक्री वाढणार आहे.
अवकाळी पावसामुळे भाजी पिकाचा कालावधी पुढे सरकतो. ओल्या जमिनीत लगेच लागवड करता येत नाही. तयार रोपांमुळे सुरुवातीचा लागवड कालावधी कमी करता येतो. 20 ते 25 दिवसांची रोपे लागवड केल्याने मागील कालावधी भरून निघतो व उत्पादनही लवकर सुरू होते.
-रामदास जाधव, शेतकरी-बोरघर







