रस्ते, गटारे, पाणी, खेळाचे मैदान आणि शाळांचा अभाव
| उरण | प्रतिनिधी |
तालुक्यातील सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील रहिवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून, येथील रहिवाशांना नागरी सुविधा मिळणेही दुरापास्त झाले आहे. यात मुख्य म्हणजे प्रत्येक नोडमध्ये रस्त्याची सुविधा, पाण्याची समस्या, सांडपाणी निचरा होण्यासाठी गटारे, शाळा, खेळाचे मैदान आदी समस्या आहेत. सिडको नोड द्रोणागिरी सेक्टर 55 मध्ये अपेक्स लॅण्डमार्क बिल्डिंग येथे गटाराचे पाणी रस्त्यावर आले आहे. मच्छरांनी उच्छाद मांडला आहे, त्यामुळे येथे रोगराई पसरण्याचा धोका असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
उरण तालुक्यात जेएनपीए, ओएनजीसी, बीपीसीएल या मोठ्या प्रकल्पांसह अनेक वेअर हाऊसेस गोदामे वसली आहेत. त्यात नुकतेच उरणला उरण रेल्वे आणि अटल सेतू या दोन प्रमुख दळणवळणाच्या साधनांनीही जोडले आहे. त्यामुळे सिडकोने विकसित केलेल्या द्रोणागिरी नोडमध्ये रहिवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मात्र, त्या अनुषंगाने येथे नागरी सुविधा देण्यात सिडको अपयशी ठरली आहे. या वसाहतीत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सिडकोची असतानाही अनेक वर्षांनंतर मात्र येथील बहुतांशी सेक्टरमध्ये पाण्याची समस्या आहे, काही इमारतींना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. रहिवाशांना ये-जा करण्यासाठी अद्याप व्यवस्थित रस्ते निर्माण केले नाहीत, त्यामुळे खड्ड्यातून किंवा कच्च्या रस्त्यातून मार्ग काढावा लागत आहे. काही ठिकाणी गटारांची निर्मिती करण्यात आले आहे. तर, काही भागात गटारांची निर्मितीच करण्यात आलेली नाही. गटारांची निर्मिती करण्यात आली आहे, तिथे गटारे ओव्हर फ्लो होऊन गटाराचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.
येथे मोठ्या प्रमाणात नागरिक आता राहण्यास आले असले तरी येथे अद्याप मुलांसाठी कोणतीही शाळा नाही, त्यामुळे येथे राहणाऱ्या मुलांना उरण शहर किंवा जेएनपीएच्या शाळेत जावे लागते. तसेच येथील मुलांना खेळण्यासाठी मैदानाची उपलब्धताही झालेली नाही. या वसाहतीमध्ये एखादा विरंगुळ्यासाठी गार्डनचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. अशा अनेक समस्यांचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. या समस्या सोडवण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.







