वादळी वाऱ्यांचा फटका; खवय्यांचे बजेट कोलमडले
| उरण | प्रतिनिधी |
वाढते वादळी वारे व हवामानातील बदलांमुळे मासेमारी बोटी रिकाम्या परतू लागल्याने मासळीची आवक घटली आहे. यामुळे मासळीच्या घाऊक आणि किरकोळ दरात 25 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या अनेक कारणांनी भाज्यांचे दर वाढले असताना मासळीच्या दरानेही उसळी घेतल्यााने सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडू लागले आहे.
उरण तालुक्यातील किनारपट्टीवरील करंजा, मोरा, दिघोडे, आवरे परिसरात मोठ्या प्रमाणात खोल समुद्रातील मासेमारी करण्यात येत आहे. करंजामध्ये नव्याने सुरू झालेल्या करंजा-द्रोणागिरी मत्स्य व्यवसाय बंदर येथे अनेक व्यापारी आणि स्थानिक रहिवासी हे घाऊक आणि देनंदिन गरजेसाठी आवश्यक मासळी खरेदी करू लागले आहेत. यामध्ये सायंकाळच्या सुमारास भरणाऱ्या बाजारामध्ये छोट्या करंदीपासून कोलंबी, पापलेट, सुरमई, रावस, कलेट, हलवा, कुपा, बोंबील असे सुमारे 30 ते 40 प्रकारचे अनेक मासे विक्रीसाठी दिसून येत आहेत. तर करंजा येथील या बंदरात 100 रुपयांपासून 1200 रुपये किलोच्या दराने मासळी विक्री करण्यात येत आहे. तर करंजा बाजारात बला, वाम, पाला, माखली, मांदेली, ढोमी, पाकट, शिंगाला, चिंबोरी असे मासेदेखील विक्रीसाठी असल्याचे दिसून आले आहे. तर या मासळी बाजारात सुरमई, कोलंबी, कुपा, पापलेट, कलेट यांना अधिक मागणी आहे. यात पापलेट, सुरमई, तिष माशांचे प्रकार कमी प्रमाणात मिळत आहे. सागरी किनाऱ्यावरील हजारो बोटी बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. सततच्या बदलत्या हवामानामुळे मासळीची आवक घटली आहे. परिणामी भाव चांगलेच कडाडले आहेत. अचानकपणे वादळी वारे सुटल्याने करंजा आणि परिसरातील शेकडो मासेमारी बोटी मासळीविना परतल्या आहेत.
खवय्यांच्या खिशाला चाट
रायगडच्या खोल समुद्रातील चविष्ट म्हावरे, सुरमई, पापलेट म्हणजे खवय्यांचा जीव की प्राणा पण सध्या म्हावरे कडाडल्याने खवय्यांना आपल्या खाण्याला मुरड घालावी लागत आहे. त्याचप्रमाणे खिशाला चाट बसत आहे. या एका पापलेटच्या नगासाठी 1 हजार 200 ते 1400 रुपये मोजावे लागत आहेत. तर अधिक मागणी असलेल्या सुरमईसाठी 1 हजार, कोळंबी 500 तर हलवा 550 वर जाऊन पोहोचला आहे.






