सततच्या पावसामुळे माथेरान गारठले

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये अजूनही जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून माथेरान शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी माथेरानमध्ये पावसांच्या सरींवरसरी कोसळत आहेत.त्यामुळे संपूर्ण धुक्याची चादर पसरली असून माथेरान चांगलेच गारठले आहे.सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगेत गिरीशिखरावर वसलेले आहे. समुद्र सपाटीपासून 2636 फूट उंचीवर असल्याने आणि तसेच घनदाट जंगलाने हे संपूर्ण व्यापलेले असल्याने येथे पावसाचे प्रमाण अधिक असून दरवर्षी येथे चांगला पाऊस पडतो.

यंदा पावसाने शहराला अक्षरशः झोडपले असून जून महिन्यात 426 मिमी इतका पाऊस पडला होता. तर जुलै महिन्यात 24 दिवसांमध्ये 2689 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याच बरोबर माथेरान शहराचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान 3038 मिमी असून एकूण 55 दिवसात 3210 मि.मी इतका पाऊस पडला आहे.आणि या कोसळत असलेल्या जोरदार प्रजन्यवृष्टीमुळे संपूर्ण शहराने जणू काही धुक्याची चादर पांघरल्याचा भास होत आहे.जर का असाच पाऊस कोसळत राहिला तर यावर्षी रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. येथे येणारे पर्यटक देखील या पाऊस आणि धुक्याचा मनसोक्तआनंद घेताना दिसत आहेत.

Exit mobile version