| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये मागील आठवड्याभरापासून परतीचा पाऊस जोर धरत आहे. त्यामुळे येथील वातावरणात बदल झालेला दिसत असून, सर्वत्र धुक्याची दुलई पसरली आहे.आणि अशातच येथे काही भागात पाऊस आणि काही भाग मोकळा असेदेखील चित्र येथे पर्यटकांना पहावयास मिळाले. सकाळपासूनच सर्वत्र धुक्याची दुलई आणि पावसाने दररोज संध्याकाळच धरली असून, विजेचा लपंडावदेखील सुरू आहे. यामुळे नागरिकांना व पर्यटकांना थोडासा त्रास सहन करावा लागत आहे.
मागील आठवड्याभरापासून परतीच्या पावसामुळे इथल्या वातावरणात बदल झालेला दिसत आहे. प्रत्येक पॉईंटवरून न्याहाळता निसर्गसौंदर्याच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला बघायला मिळत आहेत. तसेच दिवसभर दाट धुके आणि दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह येणारा पाऊस त्यामुळे येथील वातावरण चांगलेच बदलून गेले आहे. मागील दोन दिवसांपासून संध्याकाळी पाचनंतर परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला होता. ढगांचा गडगडाट आणि त्यातच विजेच्या लखलखाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.यामुळे माथेरान मधील विद्युत पुरवठा देखील काही काळासाठी खंडित करण्यात आला होता. या परतीच्या पावसामुळे पर्यटकांची व नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.