पनवेलसह 29 गावातील नागरिकांना फटका
| पनवेल | प्रतिनिधी |
पगारास सातत्याने उशीर होत असल्याने पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. पनवेल शहरासह तालुक्यातील 29 गावांना या आंदोलनाचा फटका बसला. पाणी नसल्याने नागरिकांनी तक्रारी सुरु केल्याने प्रशासन ताळ्यावर आले. त्यांनी तातडीने आंदोलकांची भेट घेत त्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत सुरु झाला.
मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्यामुळे आणखी किती दिवस हे सहन करायचे? असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. गुरूजी इंटरप्रायजेस या मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपनीकडून काम करणाऱ्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. दिवाळी बोनसची रक्कम अपूर्ण देण्यात आली होती. संबंधित ठेकेदार व्यवस्थापनाकडून तीन वेळा वेगवेगळी तारीख देवून चालढकलपणा केला जात होता. ठेकेदाराकडून 15 तारीख देण्यात आली होती. परंतु, 15 जानेवारीला देखील ही उर्वरित रक्कम जमा न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. पहाटे 4 वाजल्यापासून पाणी सोडण्याचे कामबंद करण्यात आले. त्याचा फटका महापालिका क्षेत्रातील 29 गावे आणि पनवेल शहराला बसला.
नळाला पाणी नसल्याने नागरिकांची सकाळी चांगलीच गैरसोय झाली. पाण्याविना हाल होत असल्याने त्यांनी चांगलाच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता काम बंद केल्याचे समजले. कर्मचाऱ्यांना विनवणी करण्यास सुरूवात झाली. परंतु, पगार झाल्याशिवाय काम करणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे अनेक दिवस न होणारा पगार ठेकेदार गुरूजी इंटरप्रायजेसने तातडीने कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला. पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता विलास चव्हाण यांनी पाणीपुरवठा सर्व्हिस केंद्रावर बैठक घेवून कर्मचाऱ्यांना काम सुरू करण्याची विनंती केली. यापुढे पगार होण्यास देखील विलंब होणार नाही, असे सांगितल्यानंतर कर्मचाऱ्यांनी एक पाऊल मागे टाकत कामाला सुरूवात केली. त्यानंतर पनवेलकरांना पाणीपुरवठा सुरू झाला.