वादळी पावसामुळे मुरूड किनार्‍यावरील मासेमारी ठप्प

अरबी समुद्रात वादळी वारे; 100 नौका किनार्‍यावर
| मुरूड जंजिरा | प्रतिनिधी |

गेल्या आठ दिवसांपासून समुद्रात सुरू असलेल्या वादळी हवामाना मुळे अरबी समुद्रात मासेमारी करणे जोखमीचे आणि बेभरवशाचे बनले आहे. मुरूड समुद्रात मासेमारीस गेलेल्या छोट्या- मोठ्या सुमारे 100 नौका मासळी न मिळाल्याने राजपूरी, एकदरा, मुरूड, नांदगाव,मजगाव आदी खाडी बंदरात सोमवारी आणि मंगळवारी रिकाम्या हाताने परतल्याची माहिती एकदरा, राजपूरी येथील मच्छिमार पांडुरंग आगरकर, धनंजय गिदी, रोहन निशानदार, ललित मढवी, यांनी दिली. मच्छिमारांवर मासेमारी बाबत संकटांची मालिकाच सुरू असून शासनाने मच्चीमारांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी रायगड मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले, यांनी केली आहे.

मच्छिमार रोहन निशानदार यांनी सांगितले की, मच्छिमारीचा मोठा हंगाम असला तरी समुद्रात अचानक बदलते वातावरणामुळे किनार्‍यावर आलेली मासळी काही कालावधीतच खोल समुद्रात जात आहे. अचानक उठलेले उपरती वारे, हेटशी वारे यामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळत असल्याने पारंपरिक नौका घेऊन खूप खोलवर मासेमारीस जाणे धोकादायक आहे. शिवाय मासळी मिळेल याची वादळी स्थितीत शक्यता नाही. गेल्या आठ दिवसात अनेक मच्छिमार नुकसान सोसून किनार्‍यावर परतले आहेत.मार्केट मध्ये पापलेट, घोळ, सुरमई, रावस अशी मासळीच काय बोंबिल देखील दिसून येत नाहीत.समुद्रात वादळ सदृश परिस्थिती असून समुद्रात कोणत्या घडामोडी घडतील हे कोणालाच सांगता येणार नाही अशी माहिती मुरूड येथील मच्चीमारांनी दिली.पावसाचे अस्मानी संकट मआफ वासून असल्याने भयप्रद वातावरण दिसत आहे.

राजपूरी येथील मच्छिमार धनंजय गिदी, यांनी सांगितले की,जवळा देखील सध्या मिळत नाही.सामान्य प्रकारची मासळी मिळाली तरी पावसामुळे सुकवायला जागा नाही.लहरी हवामान मच्छिमारांचे जीवावर उठले असून पारंपरिक मच्छिमार हवालदिल झाला आहे.मासळी पकडणे आणि विक्री करणे असे दोन भाग मिळून कोळी बांधवांचा उदरनिर्वाह चालतो.सध्या दोन्ही बाजू ठप्प असल्याचे कोळी मच्छिमार बांधवांनी सांगितले.सध्या सर्व नौका पाण्यात किनार्‍यावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.मुख्य मासेमारी कधी पूर्वपदावर येणार याची चिंता मच्चीमारांना सातत्याने लागून राहिली आहे.मासळी नसल्याने पर्यटक देखील हिरमुसल्याचे ऐकायला मिळत आहेत.पावसाचा देखील पर्यटनावर मोठा परिणाम जाणवेल असे दिसून येत आहे.

Exit mobile version