। पनवेल । वार्ताहर।
कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांना घराबाहेर पडता आले नाही. वलप गावाजवळील तळोजा कासाडी नदीला देखील महापूर आला होता. या ठिकाणी कामासाठी जात असलेले रामचंद्र गायकवाड हे तब्बल दोन तास झाडावर अडकून बसले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना अथक प्रयत्नानंतर खाली उतरवले.
बरसत असलेल्या धो-धो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. गाढी नदी, कासाडी नदी व सर्वच नद्या दुधडी भरून वाहत होत्या. काही गावांमध्ये घरात पाणी शिरले तर काही सोसायट्यांमध्ये देखील पाणी गेले. अनेक वाहने पाण्याखाली गेली. काही गावांमध्ये जाण्यासाठी रस्त्यात गुडघाभर पाणी होते. वलप-कानपोली जवळील कासाडी नदीला पूर आला होता. यावेळी मूळचे उरण येथील आणि कानपोली येथील बालाजी कॉम्प्लेक्समध्ये राहणारे रामचंद्र गायकवाड हे ड्युटीवरून येत होते. यावेळी ते या पाण्याचा प्रवाहात अडकून राहिले. त्यामुळे ते थेट झाडावर चढले. पाण्याचा प्रवाह जास्त होता. याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशामक दलाची गाडी देखील पाण्याच्या प्रवाहात पुढे येत नव्हती. त्यामुळे गाडी इथेच थांबवण्यात आली. त्यानंतर तळोजा अग्निशामक दल, सिडको अग्निशामक दल यांनी अथक प्रयत्न करून रामचंद्र गायकवाड यांची बांबू आणि रस्सीच्या सहाय्याने सुटका केली.