खाडीत डेब्रिजचा भराव; पर्यावरणासह कांदळवनाला धोका

महसूल, वनविभागाचे दुर्लक्ष
| उरण | वार्ताहर |
तालुक्यातील विंधणे, चिर्ले, वेश्‍वी, पागोटे, नवघर खाडीकिनार्‍यावर विकासकांकडून डेब्रिजचा भराव टाकण्यात येत आहे. त्यामुळे खाडी बुजवली जात असून, कांदळवन नष्ट होऊन पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. मात्र, संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून, खुलेआम डेब्रिज टाकणार्‍या आणि भांडवलदार यांची महसूल आणि वनविभाग पाठराखण करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत तहसिलदार आणि वन विभागाच्या अधिकार्‍यांनी असा प्रकार आढळून आल्यास कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.

जेएनपीटी बंदर,न्हावा शेवा-शिवडी सेतू आणि नवी मुंबई विमानतळ या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे विकासकांनी तसेच भांडवलदार यांनी आपला मोर्चा हा उरण तालुक्यातील संपादित करण्यासाठी वळविला आहे. त्यात काही विकासक आणि भांडवलदार यांनी महसूल आणि वन विभागाचे अधिकारी यांच्या मध्यस्थीने खाडीकिनार्‍यावरील जमिनीवर डेब्रिजचा भराव टाकून खारफुटीची झाडे नष्ट करण्याचे काम सुरू आहे, असा आरोप येथील जनतेकडून करण्यात येत आहे. या घटनेसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी यांनी आवाज किंवा तक्रार दाखल केली तर आणि वन विभागाचे अधिकारी हे सदर खाडीकिनारी अज्ञात व्यक्तीनी भराव टाकला तसेच त्याठिकाणी खारफुटी नसल्याचा खुलासा करुन विकासक आणि भांडवलदार यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.


त्यामुळे विंधणे, चिर्ले, वेश्‍वी, पागोटे व नवघर या ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनारे, पाणलोट क्षेत्र तेथील खारफुटीची झाडे नष्ट होत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर समुद्रातील उधाणाचे पाणी हे हळूहळू गाव परिसरात शिरूर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा संभव आहे. तरी, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आणि कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून प्रथमतः महसूल आणि वन विभागाचे अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून अज्ञात व्यक्तींकडून खाडीकिनार्‍यावर डेब्रिजचा भराव होणार नाही, अशी मागणी शेतकरी, जनमानसातून करण्यात येत आहे.

उरण तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत खाडीकिनारी डेब्रिजचा भराव होत असल्यास आपल्याकडील माहिती पाठवा, तात्काळ अधिकार्‍यांना पाठवून कारवाई करण्याचे आदेश देतो. – भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, उरण

विंधणे ग्रामपंचायत हद्दीत अशा प्रकारे भराव करण्यात आला होता, संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. अन्य कुठे भराव करुन खाडी आणि कांदळवनाला धोका पोहोचविला जात असेल, तर तात्काळ कारवाई करण्यात येईल. – श्री. कोकरे, वन अधिकारी, उरण

Exit mobile version