परिसरातील नागरिकांना धोक्याची घंटा; वाहनचालकांचे जीव मुठीत धरून मार्गक्रमण
| ठाणे | प्रतिनिधी |
मुंबई शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा दुर्गंधीयुक्त घातक कचरा आणि डेब्रिज उरण-पनवेल परिसरातील खासगी, सिडकोच्या जागांवर बेकायदेशीरपणे टाकला जात असल्याचा गंभीर प्रकार उरणमध्ये सर्रास सुरू आहे. हा कचरा केवळ दुर्गंधी आणि पर्यावरणाचे प्रदूषण करत नाही, तर थेट परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. या कचऱ्यात केवळ प्लास्टिक आणि सामान्य घाण नसून, मृत पशुपक्षी, प्राण्यांचे अवयव आणि गटारातील घाणही मोठ्या प्रमाणात मिसळलेली असते. यामुळे परिसरात जीवघेणी दुर्गंधी पसरत आहे. मुंबईतील इमारतींचे डेब्रिजही या कचऱ्यासोबत अवजड डंपर्सद्वारे दररोज आणले जाते. काही व्यावसायीक कमी पैशात मिळालेल्या या कचरा-डेब्रिजचा उपयोग खासगी जागांवर भराव करण्यासाठी करत आहेत. उरण परिसरातील चिरनेर, जासई, चिरले, वेश्वी, गव्हाण फाटा, दिघोडे, जुई, खोपटा, कोप्रोली रस्त्यांवर तसेच उलवे नोड परिसरातील सिडको आणि वनखात्याच्या जागांवर हा कचरा बिनदिक्कतपणे टाकला जात आहे.
यामुळे परिसरातील नागरिक आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना नाक मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. या कचर्यामुळे परिसरातील वायू प्रदूषणात मोठी भर पडली आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. श्वसनाचे आजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दररोज येणाऱ्या हजारो टन कचरा आणि डेब्रिजमुळे उरण-पनवेल, गव्हाण मार्गाच्या बाजूला असणाऱ्या शासकीय जागांवर आता कचऱ्याचे मोठे डोंगरच तयार झाले आहेत.
कमी पैशात मिळणाऱ्या या डेब्रिजचा वापर करून खाजगी जागांवर भराव केला जात आहे. मात्र, डेब्रिज भरावासाठी शासनाचे नियम आणि स्वामित्व धन भरणे बंधनकारक असताना, या बेकायदेशीर कृत्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडाला जात आहे. डेब्रिजचा वापर करून अवैध भराव करणाऱ्यांकडून शासनाची मोठ्या प्रमाणात आर्थीक फसवणूक होत आहे. या सर्व गंभीर प्रकाराकडे संबंधित शासकीय अधिकार्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
यापूर्वी प्रांताधिकाऱ्यांनी डेब्रिज टाकणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, मात्र ही कारवाई केवळ कागदावरच राहिली. पर्यावरणाचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असतानाही, शासकीय यंत्रणांकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याने परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या बेकायदेशीर कचरा डंपिंगमुळे पर्यावरण नियमांचे उल्लंघन होत असून, शासकीय अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळेच हे व्यावसायीक मोकाटपणे काम करत आहेत. बेकायदेशीर कचरा डेब्रिज टाकणाऱ्या व्यवसायिकांवर आणि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. हा कचरा बेकायदेशीरपणे टाकण्यामागे केवळ साधे वाहतूकदार नसून, संघटित कचरा माफियाचे एक मोठे रॅकेट कार्यरत आहे. हे माफिया मुंबईतील कचरा कमी दरात उचलतात आणि उरण-पनवेल भागात बेकायदेशीरपणे डंप करून लाखोंची कमाई करतात. या माफियांचे जाळे वाहतूकदार, जागेचे दलाल आणि काही स्थानिक हातमिळवणी करणाऱ्या व्यक्तींपर्यंत पसरलेले आहे. कमी पैशात जागा भराव करण्यासाठी उपलब्ध होत असल्याने, डेव्हलपर्स आणि खासगी जमीन मालक देखील या माफियांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन देत आहेत. अनेक ठिकाणी हा डेब्रिज आणि कचरा खाडीकिनारी असलेल्या खारफुटीच्या वनांमध्ये आणि पाणथळ जागांमध्ये टाकला जात आहे. खारफुटी नष्ट झाल्यामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. हे खारफुटीचे वनक्षेत्र पूर नियंत्रण आणि नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, जे आता धोक्यात आले आहे.
साथीच्या रोगांचा धोका
डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि इतर गंभीर साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. सततच्या वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार, अस्थमा आणि त्वचेचे आजार नागरिकांमध्ये वाढत आहेत, जे दीर्घकाळात गंभीर समस्या निर्माण करतील.







