| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई – गोवा महामार्गाचे काम अद्यापही 30 टक्के बाकी असून, मार्गावर आजही खड्डे असल्याने पर्यटकांसह स्थानिकांना गचके खातच प्रवास करावा लागला. हा महामार्ग पूर्ण होणार तरी कधी असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मुंबई-गोवा महामार्गा वरील चौपदरीकरणाचे काम अजूनही बाकी असणारे ओव्हर ब्रिज, सर्व्हिस रोड हे पाहता पुन्हा पुढील वर्षही महामार्गाची रडकथा सुरूच राहील, असे चित्र दिसत आहे. महामार्गाचे अजून 30 टक्के काम बाकी आहे.
गणेशोत्सवातही याच खड्ड्यातून प्रवास करणाऱ्यांनी खड्ड्यातून येजा करत सरकारच्या नावाने उद्धार केला. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची गंभीर समस्या उभी राहिली.दिवाळी संपताच सुट्टीची मजा लुटण्यासाठी लाखो पर्यटक रायगडात येऊ लागलेले आहेत. मात्र, रस्तेच चांगले नसल्याने त्यांचा प्रवासही खडतर होताना दिसत आहेत. यावर ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झालेली आहे.
इंदापूर ते माणगाव या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी दररोज होत असते. यासाठी बायपास मार्ग संपादन करण्यात आले. मात्र या कामाला अजून सुरुवातही झाली नाही. महामार्गावर मधोमध अजूनही 80 टक्के वृक्ष लागवड केलेली नाही. यामुळे महामार्गावर प्रवास करताना कुठेही सावली आढळून येत नाही. 2026 उजाडल्यानंतरही पुढील सात-आठ महिने ही कामे चालूच राहतील, सर्विस रोड, ओवर ब्रिज काम पूर्ण होण्यास अजून सहा सात महिने लागणार हे निश्चित आहे, त्यामुळे महामार्गाची अवस्था सध्या तरी खड्डयातूनच जाणारी असेल असे चित्र दिसत आहे. महामार्गावर पथदिवे यांचे खांब लावण्यात आले आहेत, मात्र हे पथदिवे अजून सुरू झालेले नाहीत तर काही ठिकाणी पथदिव्यांचे खांब सुद्धा लावलेले नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळेस प्रवास करताना स्वतःच्या गाडीच्या उजेडावरच प्रवास करावा लागतो यातून अनेकदा अपघात घडलेले आहेत.





