| दापोली | प्रतिनिधी |
हर्णे बंदरात गेल्या तीन दिवसांपासून सकाळी व संध्याकाळी पर्यटकांची रेकॉर्डब्रेक गर्दी पाहायला मिळत आहे. बंदराला जत्रेसारखे गजबजून गेले होते. पर्यटकांच्या मासळी खरेदीतून दररोज लाखोंची उलाढाल होत असून मच्छिमार महिलांना चांगला फायदा मिळत आहे. हर्णे बंदर हे दापोली तालुक्यातील सर्वात मोठे मासळी केंद्र आहे. या परिसरातील चिमणी बाजार हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत असून ताज्या मासळीच्या लिलावात सहभागी होण्याचा वेगळाच अनुभव पर्यटक घेत आहेत. कोळंबी, सुरमई, पापलेट, बांगडा, म्हाकुळ, बेबी म्हाकुळ, बग्गा आदी जातींना मोठी मागणी आहे. लिलावातील बोली लावताना पर्यटकांना सीफूड मार्केटचा अनोखा अनुभव मिळत आहे. सध्या बंदरामध्ये म्हाकूल – 350 रु किलो ; पापलेट – 800रु किलो, सुरमई – 600 रु किलो, कोळंबी (जाडी) – 300 रु किलो; बांगडा – 100 रु किलो; सरगा – 350 असे दर आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मासळीची आवकही मुबलक झाल्याने खवय्यांची चांगलीच चंगळ उडाली आहे.







