पर्यटकांची पाऊले रायगड किनारी

सुट्टीमुळे सर्वत्र हाऊसफुल्ल

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

शाळा महाविद्यालयांना सुट्टी पडली आहे. परंतु अन्य जिल्ह्यात वाढते तापमान नकोसे झाले आहे. त्यामुळे मुंबई, पुणे व अन्य जिल्ह्यातील पर्यटकांनी उन्हाळी सुट्टी रायगड जिल्ह्यात घालविण्याला पसंती दर्शविली आहे. उन्हाळी सुट्टी सुरु झाल्यापासून पर्यटक रायगडमध्ये येऊ लागले आहेत. अलिबागसह अन्य समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलू लागली आहेत. जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. यातून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.


वाढत्या तापमानामुळे उष्मा घाताचा धोका निर्माण झाला आहे. शाळांमधील परीक्षा पुर्ण झाल्या आहेत. परंतू तापमानामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडू नये यासाठी शिक्षण विभागाने 21 एप्रिलपासून शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केल्याने पालक वर्गदेखील सुखावून गेले आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची तयारी सुरु झाली आहे.  उन्हाळी सुट्टी कुठे घालवायची याचे नियोजन गेल्या अनेक दिवसांपासून पर्यटकांनी केले होते. जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून तापमान वाढत आहे. उष्णतेने कहर केला आहे. दुपारच्यावेळी घरातून बाहेर पडणेदेखील नकोसे होत आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टी रायगड जिल्ह्यात घालविण्याचा निर्णय पर्यटकांनी घेतला आहे.  सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यात येऊ लागले आहेत. काही जण दोन दिवस, तर काही जण आठ दिवस येऊन सुट्टीचा आनंद लुटत आहेत. रायगड जिल्ह्याला निसर्गाची कृपा लाभली आहे. सुंदर असा समुद्रकिनारा, नारळी पोफळीची बागा, कुलाबा, रायगड, कोर्लई, खांदेरी, उंदेरी अशी वेगवेगळी ऐतिहासिक गड किल्ले, सरखेल कान्होजी, वेगवेगळी धार्मिक स्थळे अशा अनेक प्रकारची पर्यटने आहेत.

उन्हाळी सुट्टी घालविण्यासाठी अलिबाग, नागाव, वरसोली, किहीम, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर येथील समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. किनार्‍यावर असलेली पॅरास्लायडींग अशा अनेक सागरी खेळाबरोबरच बोटींग, घोडागाडी, एटीव्ही बाईक, सायकलमधून सवारी करीत पर्यटक आनंद लुटत आहेत. उन्हाळी वातावरण असल्याने जास्तीत जास्त पर्यटक समुद्राच्या पाण्यात पोहचण्याचा आनंद घेण्याला अधिक पसंती दर्शवित आहेत. जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहण्याला पर्यटकांनी भर दिला आहे. त्यामुळे समुद्रकिनारी असलेले हॉटेल, कॉटेजेस, रिसॉर्टमध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

मासळीवर ताव
रायगड जिल्ह्यामध्ये आल्यावर पर्यटक सागरी मासळी खाण्यावर अधिक भर देत आहेत. पापलेट, सुरमई, बांगडा, कोलंबी, चिंबोरी, शिंपल्या अशा अनेक प्रकारची सागरी मासळी फ्राय करून खाण्याला पर्यटक पसंती दर्शवित आहेत. सर्वात जास्त जिताडा, चिंबोरी, बोंबील या मांसाहारावर ताव पर्यटक मारत असल्याचे हॉटेल व्यवसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

उन्हाळी सुट्टीमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यात येऊ लागले आहेत. सागरी मासळी खाण्यावर पर्यटक अधिक भर देत आहेत. त्यामध्ये शिंपले, चिंबोरीसह जिताडा सारखी मासळी फ्राय करून खाण्याला अधिक पसंती आहे.

मंगेश म्हात्रे, हॉटेल व्यवसायिक
Exit mobile version