पाणीपुरवठा योजनेची चौकशी करण्याची मनसेची मागणी
। उरण । वार्ताहर ।
पुनाडे धरण परिसरातील रहिवाशांना भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जलजीवन मिशन हर घर जल या योजनेच्या माध्यमातून सुमारे 10 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे सदर योजनेचे काम संथगतीने सुरू असून रहिवाशांना दुषित पाणी पिण्यास मिळत आहे. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने सदर योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी उरण तालुका मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.
मनसेचे तालुकाध्यक्ष अॅड. सत्यवान भगत यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उपअभियंता प्रशांत पांढरपट्टे यांच्या दालनात सोमवारी (दि.7) भेट घेऊन पुनाडे नळ पाणीपुरवठा योजनेची माहिती करून घेतली. यावेळी उपअभियंता प्रशांत पांढरपट्टे यांनी योजनेचे काम सुरू असल्याचे सांगितले. यावेळी अॅड. सत्यवान भगत यांनी त्यांच्या निदर्शनास आणून देताना सांगितले की, उरण पूर्व विभागातील जनतेला भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या देखरेखीखाली (केंद्र 5 कोटी 44 लाख 59 हजार 003-5 रु.तसेच राज्य 5 कोटी 44 लाख 59 हजार003-5 रु.) सुमारे 10 कोटी 89 लाख 18 हजार रुपये खर्चाची पुनाडे नळ पाणीपुरवठा योजना 2022 साली मंजूर झाली आहे. सदर योजना ही आपल्या कार्यालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या मे.गोरुर इन्फ्रा प्रा.लि. नवी मुंबई तसेच इतर नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदारांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
परंतु, सदर पाणीपुरवठा योजनेचे काम हे संथगतीने अत्यंत निकृष्ट दर्जाचे शासनाच्या नियमानुसार होताना दिसत नाही. त्यामुळे रहिवाशांना दुषित पाणी पिण्यास मिळत असल्याने रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. एकंदरीत शासनाचा मंजूर झालेला निधी अल्पावधीत वाया जाणार आहे. तरी आपल्या कार्यालयाकडून ठेकेदाराला बिल अदा करण्यात येऊ नये. न पेक्षा जनहितार्थ या विरोधात मनसेच्या माध्यमातून उग्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा उपअभियंता प्रशांत पांढरेपट्टे, उप अभियंता नामदेवराव जगताप यांच्याशी चर्चा करताना मनसेचे तालुकाध्यक्ष अॅड. सत्यवान भगत यांनी दिला आहे. यावेळी पिरकोन ग्रामपंचायतचे उपसरपंच दीपक पाटील, तालुका सचिव वाहतूक विभाग विधानसभा सभा सचिव साईराज माळी, कर्नाळा विभाग अध्यक्ष आशिष पगडे उपस्थित होते.
पुनाडे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग – पनवेल उरणचे अभियंता प्रशांत पांढरपट्टे यांनी दिली आहे.