शेडअभावी प्रवाशांची उन्हात लाहीलाही

| सुकेळी | वार्ताहर |

प्रवासी शेड नसल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाकण नाक्यावर रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी महत्त्वाचा थांबा असलेल्या ठिकाणी अजूनही प्रवासी शेड बांधण्यात आलेले नाही. त्यामुळे रणरणत्या उन्हात प्रवाशांना उभे राहावे लागत आहे. प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी दोन्ही बाजूला प्रवासी शेड बांधण्यात यावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर वाकण नाका हा महत्त्वाचा थांबा आहे. मुंबई, पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, रत्नागिरी व तळ कोकणात आणि गोव्याला जाणारी सर्व वाहने व एसटी इथे थांबतात. हा मार्ग पाली-खोपोली राज्य महामार्ग व तेथून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-बंगलोर महामार्गाला जोडतो. शिवाय पाटणूस व ताम्हिणीमार्गे पुणे मार्गालाही जोडतो. पालीसह आजूबाजूच्या इतर गावातील लोक, विद्यार्थी व चाकरमानी रोज मुंबई, पनवेल, पेण, अलिबाग; तसेच रोहा, कोलाड, माणगाव, लोणेरे, महाड व पोलादपूर आदी ठिकाणी जाण्यासाठी वाकण नाक्यावर उभे असतात. रोज प्रवास करणारे चाकरमानी व विद्यार्थीही नियमित येथे थांबतात. या मार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. हा नवीन महामार्ग होण्याआधी रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या मोठ्या झाडांच्या सावलीखाली प्रवासी थांबत होते. परंतु चौपदरीकरणामुळे येथील सर्व झाडे तोडण्यात आल्याने आता भर उन्हात व पावसात प्रवासी, विद्यार्थी, महिला व अबालवृद्धांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे हे सर्व प्रवासी प्रचंड वैतागले आहेत.

Exit mobile version