। मुरुड । प्रतिनिधी ।
मुरुड समुद्रकिनारी डांबर सदृश्य चिकट जाडसर ऑईल मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने मच्छिमारांनी चिंता व्यक्त केली आहे. खोल समुद्रातील मासेमारी सध्या बंद असली तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी समुद्र किनारी जाळी टाकून पेर्याने मासेमारी करतात. परंतु या वाहून आलेल्या खराब ऑईलमुळे समुद्रातील पाणी दूषित होते. तसेच मासे खोल समुद्रात जातात. परिणामी, किनार्यावरील मासेमारीवर त्याचा मोठा परिणाम होतो.
मुरुडमधील सागरकन्या मच्छिमार सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले कि, खोल समुद्रातील तेल विहिरी प्रकल्पातील जळलेले खराब ऑईल समुद्रातील पाण्यात मिसळले जाते. ते दूरपर्यंत वाहून जाते व ज्या परिसरात ते ऑईल पसरते तेथील पाणी दूषित झाल्याने मासे आणखी खोल समुद्रात जातात. त्यामुळे मच्छिमारांना मासेमारीसाठी खोल समुद्रात जावे लागत असल्याने डिझेल खर्च वाढतो.
पावसाळ्यातील वादळी वार्यामुळे ते आईल किनारी फेकले जाते. त्यामुळे ते आपल्या दृष्टीस पडते. 2018 पासून डिझेल परतावा मिळालेला नाही. बँक कर्ज देत नाहीत. नीलक्रांती योजना व्यवस्थित राबविली गेली नाही. यामुळे मच्छिमार बांधव प्रचंड आर्थिक संकटात असून बरेचशे कोळी बांधव कर्जबाजारी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाने पावसाळी हंगामात गरजू कोळी बांधवांना तेल विहिरी कंपन्यांकडून थोडीफार आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी विनंती सागर कन्या मच्छिमार सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी केली आहे
—