। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यासह जिल्ह्यात दोन आठवड्यापासून अचानक सुरु असलेल्या कडक उन्हाळ्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला होता. मात्र, पुन्हा पावसाने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. या वर्षी तालुक्यात 2300 हेक्टर पैकी 1700 हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. यंदा तालुक्यातील 600 हेक्टर जमीन ओस पडली असून अनेक कारणांनी नापीक झाली आहे.
श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी भातशेती करतात. यामध्ये मेंदडी, वारळ, काळसुरी तसेच वडवली, वेळास, शिस्ते, दिवेआगर आणि बोर्लीपंचतन येथील खास करून खाडी किनारीही मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपल्या शेतात भात पीक घेतात. भात लागवडीनंतर पुरेसा पाऊस पडणे आवश्यक असताना पाऊस गायब होऊन पानतळ भाग सोडून काही ठिकाणी कडक ऊन पडू लागल्याने त्याचा परिणाम भात रोपांवर होऊ लागला होता.