ग्रामीण भागाचे शहरीकरण झाल्याने नाट्य चळवळीला तडा

कला जिवंत ठेवण्याचा कलाकारांचा प्रयत्न सुरुच

| रायगड | आविष्कार देसाई |

पूर्वी ग्रामीण भागांमध्ये मनोरंजनाचे साधन म्हणून नाटक, तमाशाची ओळख होती. गावातील जत्रा, उरुसमध्ये मोठ्या धुमधडाक्यात त्याचे सादरीकरण केले जायचे. त्यामुळे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करायची मोठी संधी मिळायची. आता मात्र, शहरीकरणामुळे जत्रा, उरुस यांचे महत्व कमी होत आहे. त्याचा फटका हा स्थानिक कलाकारांना बसत आहे. यातून काही अवलिया असे आहेत की त्यांनी यावर मात करुन ही कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला आहे. अगदी पूर्व परंपरागत चालत आलेले नाटक हे माध्यम टिकून ठेवण्यासाठी लेखक, दिग्दर्शिका, निर्मात्या तसेच कलाकार विजया कुडव यांची धडपड आजही सुरू आहे. नुकतचे रायगडमधील कलाकारांनी एकत्र येत जन्मठेप या नाटकाचा प्रयोग कातळपाडा-सातिर्जे येथे सादर केला. त्याला स्थानिक प्रेक्षकांनी भरुनभरुन दाद दिली.

कोकण अथवा अलिबाग-रायगड विभागात पूर्वी विविध प्रकारच्या विषयातून आपल्या कलेचे सादरीकरण करून मनोरंजन आणि प्रबोधन करण्यासाठी नाटक या माध्यमाचा उपयोग होत असे. नाटकाला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत होता. गावात नाटक असले की, सर्वांनाचा उत्सुकता लागलेली असायची. कलाकार देखील खुपच उत्सुक असायचे. त्यांची तयारी महीनाभर आधी सुरु व्हायची. त्यांना गावातील मंडळी देखील मदत आणि प्रोत्साहन द्यायचे.

सध्या काळ बदलला आहे आणि मनोरंजनाची विविध साधने देखील बदलली आहेत. संगणक, मोबाईल, इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे नाटक, एकांकीका, एकपात्री अभिनयासाठी ग्रामीण भागात व्यासपीठ हे सध्या हळूहळू कमी होत आहे. पूर्वी ग्रामीण भागात जत्रा, उरुस मोठ्या जल्लोषात साजरे केले जायचे. त्यामुळे या ठिकाणी नाटकाचा प्रयोग हा हमखास असायचा. त्या नाटकात भूमिका करणारी मंडळी सुद्धा गावातील असायची. त्यामध्ये काम करणारे कलाकार देखील पट्टीचे असायचे. पण योग्य व्यासपीठ उपलब्ध नसल्याने किंवा त्याची दखल घेतली जात नसल्याने अलिबाग अथवा रायगड भागातील कलाकारांना तसा न्याय मिळाला नाही, अशी खंत नाट्यकलाकार सुनील बुरुमकर यांनी व्यक्त केली.

याच क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार विजया कुडव यांनी गेली पस्तीस ते चाळीस वर्षे नाटकांतून अभिनय केला आहे. कलेविषयी मनात असलेली आवड आज सुध्दा जपत आहेत. नाटक हे माध्यम कायम टिकून ठेवण्यासाठी धडपड करत आहेत. सध्या त्यांनी जिल्ह्यातील निवडक कलाकारांना एकत्र करून मजन्मठेप म हे नाटक बसविले आहे. या नाटकाचे सादरीकरण नुकतेच कातळपाडा-सातिर्जे येथे केले. त्यावेळी नाट्य रसिकांनी ऊत्तम प्रतिसाद दिला. या नाटकाच्या निर्मात्या, दिग्दर्शिका स्वतः विजया कुडव आहेत. तर, कलाकार विजया कुडव, सुनील बुरुमकर, प्रकाश म्हात्रे, नंदकुमार पाटील, मोरेश्वर मोकल, सुधीर पाटील, अनिल पाटील, अजित नरबेकर, प्रज्वल म्हात्रे, अनिल पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील आणि नेपथ्य शैलेश मेस्त्री, संगीत नंदलाल लेळे, विशाल महाडीक, रंगभूषा गजानन गायकवाड यांची आहे. तर या प्रयोगासाठी राजन नार्वेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. नाटकाची चळवळ टिकून रहावी व आपल्या विभागातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल नाट्य रसिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.

ग्रामीण कलाकारांनमध्ये जिद्द, ऊर्जा, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी आहे. पूर्वी ग्रामीण ठिकाणी जत्रा, ऊरुस मोठ्या प्रमाणात व्हायचे. त्यामध्ये स्थानिक कलाकार विविध नाटकांच्या माध्यमातन कला सादर करायचे आता मात्र जग बदलत आहे. त्यामुळे जत्रा, ऊरुस होत असले, तरी तो उत्साह दिसत नाही आणि पूर्वी कलाकारांना संधी मिळायची ती दिसत नाही. ग्रामीण भागातील नाट्य चळवळ टिकवण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे.

विजया कुडव, ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेत्री
Exit mobile version