विहूर पुलाचे काम जुजबी केल्याने वाहतुकीचा प्रश्‍न होणार गंभीर

| मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड मुंबई रस्त्यावर असणारा विहूर पुल हा 27 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला होता. या पुलास असणारी दगडी संरक्षक भिंत मातीसह वाहून गेल्याने त्यावेळी सदरच्या पुलावरून काही दिवस वाहतूक सुधा बंद ठेवण्यात आली होती.अत्यंत महत्वाचा वाहतुकीसाठी असणारा हा पुल असताना सुधा मुरुड सार्वजनिक बांधकाम खात्याने अत्यंत जुजबी काम करून आपली जबाबदारी झ्टकण्याचे काम केले आहे.सदरील पुलाची माती व दगड टिकून राहण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे संरक्षक भिंत आवश्यक असताना सुधा केवळ मातीचा भराव टाकून हे काम आटोपते घेतले आहे.

या सरक्षक भिंतीला दगड सुधा लावण्यात आलेले नाहीत.त्यामुळे पुढील पावसात ही माती वाहून जावून पुन्हा तोच प्रश्‍न येरणीवर येणार आहे.फक्त मातीचा भराव टाकून सार्वजनिक बांधकाम खात्याने आपली जबाबदारी झ्टकुन टाकल्याने आता या पुलाचे काम होणार तरी कधी हा येथे प्रश्‍न निर्माण झाला आहे. मुरुड हे पर्यटन स्थळ असल्याने येथे हजारोच्या संख्येने गाड्यांची वाहतूक सुरू असते तरी सुधा या पुलाच्या संरक्षक भीतीला फक्त फक्त माती भराव कितपत टिकाव धरणार याचा सवाल समस्त ग्रामस्थ करीत आहेत.

27 जुलै पावसात चिकणी व विहुर पुल वाहून आज या घटनेला सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊन सुधा हे दोन्ही पुल पूर्ण करण्यात आलेले नाही.या दोन्ही पुलाबाबत येथील स्थानिक पत्रकारांनी कार्यकारी अभियंता यांना विचारणा केली असता दोन्ही कामे टेंडर प्रक्रियेत असून सिमेंट काँक्रिट ची संरक्षक भिंत बांधणार असल्याचे त्यावेळी सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र मातीचा भराव टाकला गेल्याने पावसाळ्यात हा भराव वाहून जाणार असून पुन्हा वाहतूक थांबावी लागणार आहे.दोन्ही पुलाचे काम सुरुवाती पासून खूप हळू हळू करण्यात येत होते व आजतागायत या कामाने कधीही वेग घेतला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.या पुलास संरक्षक भींत हि सिमेंट काँक्रिटची आवश्यक आहे. परंतु सदरची भींत न बांधताच फक्त मातीचा भराव टाकण्यात येऊन काम पूर्ण केल्याचा कांगावा केला जात असल्याने येथील ग्रामस्थ नाराज असून सदरचे काम प्रामाणिक पणे करावे अशी मागणी करीत आहेत.

Exit mobile version