अवकाळीमुळे कच्च्या विटा मातीमोल

| पाली/बेणसे । वार्ताहर ।
अवकाळी पावसामुळे पाली सुधागडसह जिल्ह्यातील वीटभट्टी व्यवसाय संकटात सापडला आहे. बर्‍याच ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे ऐन हंगामात वीटभट्टी चालक व मालकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.काही ठिकाणी विट भट्टी व्यावसायिकांकडून रचलेल्या भट्टीवर पावसाच्या भीतीने प्लास्टिक कापड देखील टाकण्यात आले आहे.

सध्या ठिकठिकाणी लहान-मोठया वीटभट्ट्या सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात कित्येक कोटींची उलाढाल या उद्योगात होते. सध्या सर्वत्रच मोठ्या प्रमाणात विटभट्ट्या सुरू झाल्या आहेत. मात्र अवकाळी पावसामुळे असंख्य कच्च्या विटा खराब झाल्या आहेत. विटा पाडण्यासाठी जमा करून ठेवलेली माती देखील पावसामुळे भिजली आहे. विटा भाजण्यासाठी लागणारा भाताचा कोंडा, कोळसा किंवा तूस देखील पावसामुळे भिजल्याने वीटभट्टी लावणे म्हणजेच पक्क्या विटा पडणे देखील मुस्किल झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अशा विविध मार्गाने वीटभट्टी चालक व मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मागील वर्षी लॉकडाऊन, आता कडक निर्बंध आणि अवकाळी पाऊस यामुळे वीटभट्टी मालकांना व चालकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. शासनाकडून शेतीसाठी थोडीबहुत नुकसान भरपाई मिळते मात्र वीटभट्टी चालक व मालकांसाठी तशी कोणतीच तरतूद नाही. परिणामी आलेल्या परिस्थितीवर मात करत तग धरण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही.

अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांना नव्याने पुन्हा सुरुवात करावी लागेल. विटा पडण्याचा हंगाम देखील लांबेल त्यामुळे आणखी नुकसान होईल. – अमोल देशमुख, वीटभट्टी मालक

Exit mobile version