। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
पाली नगरपंचायत कार्यालयासमोर एका भरधाव डंपरने पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास 3 गुरांना चिरडल्याची घटना घडली. यावेळी स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे डंपर थांबविण्यात आले. पोलिसांनी काही संशयित डंपर चालक व डंपर ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी स्थानिकांनी पाली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
मागील अनेक दिवसांपासून पालीतून होत असलेल्या अवजड वाहतुकीबाबत जनमाणसांत संताप होता. वेगवान डंपर कधी कुणाचा जीव घेतील, अशी चर्चा नेहमी व्हायची. अनेकदा या अरुंद रस्त्यावरून प्रवास करणार्या मोटारसायकलस्वार, लहान मुले, पादचारी यांना देखील धोका जाणवत होता. यावर उपाययोजना करावी, अशी मागणी जनता प्रशासनाकडे करीत होती; मात्र कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. अखेर डंपर चालकाने मुक्या जनावरांना चिरडले आणि अवजड व वेगवान वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.
गुरांच्या सुरक्षिततेबरोबर अपघाती घटनेनंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तरुण कार्यकर्ते केतन म्हस्के व त्यांच्या सहकार्यांनी मदतकार्य केले. या घटनेनंतर स्थानिक तरुणांनीही अपघाती घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.
दरम्यान गुरांना डंपरनेे चिरडल्यानंतर मोकाट गुरांचा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. याबरोबरच अवैध वाहतुकीवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वस्तरातून जोर धरत आहे.
महत्वाची बाब म्हणजे ज्या मालकांची ही गुरे आहेत, ती त्यांच्याकडून गोठ्यात बांधली जात नाहीत. अनेकदा गुरे चोरीच्या देखील घटना घडतात. मोकाट गुरांना मालकांनी आपल्या निगराणीखाली ठेवले पाहिजे जेणेकरून ते सुरक्षित राहतील, असे सुधागड शेतकरी संघटनेचे सचिव शरद गोळे यांनी सांगितले.
पालीत मोकाट गुरे, भटके कुत्रे तसेच माकडे यांचा उपद्रव वाढला आहे. अनेकदा नागरिकांना यांचा प्रचंड त्रास सोसावा लागतो. यातून अपघाती घटना देखील घडत आहेत. भविष्यात या अपघाती घटना रोखण्यासाठी पाली नगरपंचायत, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करून प्रभावी उपाययोजना केली जाईल.
दिलीप रायन्नावार,तहसिलदार