नोकरीसाठी गुणांकन कार्यपद्धत
। मुंबई । प्रतिनिधी ।
कोरोना काळात काम केलेल्या कंत्राटी वैद्यकीय कर्मचार्यांना नोकरीसाठी लाभ मिळावा, म्हणून गुणांकन कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि.12) दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील हजारो वैद्यकीय कर्मचार्यांना लाभ होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी अनेक निर्णय घेण्यात आले. गेल्या दोन अडीच वर्षांपासून कारोना काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली. त्यामध्ये वैद्यकीय सहाय्यक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचार्यांचा देखील समावेश आहे. कोरानामध्ये जीवावर उदार होऊन कर्मचार्यांनी सेवा बजावली. सार्वजनिक आरोग्यामधील भरतीच्या वेळी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचार्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
याबाबतची कार्यपद्धती लवकरात लवकर निश्चित करावी. जेणेकरून भरतीच्या वेळी अशा कर्मचार्यांना त्याचा लाभ होईल. तसेच सध्याच्या भरतीच्या पात्रतेच्या अधीन राहून ही कार्यपद्धती असावी, असेही ठरल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
प्रशासकीय मुदतवाढ
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सप्टेंबर 2022 पूर्वी पार पडणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. नवीन पुनर्वसन धोरणालाही यावेळी मान्यता देण्यात आली आहे.