मोकळ्या जागेवर डम्पिंग ग्राऊंड; रहिवाशी त्रस्त

| पनवेल | वार्ताहर |

खारघर, सेक्टर 16 वास्तविहार गृहनिर्माण संकुलाजवळील सांडपाणी प्रक्रिया केंद्रालगत मोकळ्या जागेवर महापालिकेकडून डम्पिंग करण्यात येणार्‍या कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

खारघर शहर स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी पनवेल महापालिका प्रयत्न करीत असताना दुसरीकडे खारघर, सेक्टर-16 मधील वास्तुविहार गृहनिर्माण संकुलाजवळील सांडपाणी प्रक्रिया केंद्र लगत मोकळ्या जागेवर महापालिकेकडून घनकचरा टाकला जात आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणावरून हाकेच्या अंतरावर वास्तुविहार गृहनिर्माण सोसायटी आणि केपीसी शाळा आहे. तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्र लगत असलेल्या मोकळ्या जागेत परिसरातील तरुण मुले क्रिकेट, व्हॉलीबॉल खेळत असतात. दुसरीकडे सदर कचर्‍यातून दुर्गंधी पसरत असल्यामुळे रहिवाशांना त्याचा त्रास होत असून महापालिकेने सदर ठिकाणी घनकचरा टाकू नये याविषयी महापालिका कर्मचार्‍यांना सांगण्यात आले असताना त्यांच्या कडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे येथील रहिवाश्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

खारघर, सेक्टर-16 सांडपाणी प्रक्रिया केंद्र लगत मोकळ्या जागेवर महापालिकेकडून घनकचरा डम्पिंग केला जात असल्यामुळे रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने रहिवाशांच्या आरोग्याचा विचार करावा.

नंदू वारुंगसे, उपशहर प्रमुख, शिवसेना (ठाकरे)
Exit mobile version